Home मराठी सुप्रिया सुळे । तुरुंगातील नेत्यांच्या मतदानासाठी भुजबळांचे प्रयत्न: भाजपच्या नकारामुळे बिनविरोध परंपरा...

सुप्रिया सुळे । तुरुंगातील नेत्यांच्या मतदानासाठी भुजबळांचे प्रयत्न: भाजपच्या नकारामुळे बिनविरोध परंपरा थांबली

नागपूर ब्युरो : आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहेत. हे आमच्यावर आणि आमच्या दोन्ही नेत्यांवर अन्याय करणारे आहे, पण आमचा न्यायालयावर विश्वास असून आम्हाला आज ना उद्या न्याय मिळेल, अशी आशा आहे. या दोन्ही नेत्यांना मतदानाची संधी मिळावी यासाठी मंत्री छगन भुजबळ स्वतः प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला खूप गांभीर्याने घेत असून, ही आनंदाची बाब आहे. या देशात अनेक पक्ष आहेत. प्रत्येक पक्ष, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असणे गैर नाही. आणि यात नवीन काही नाही. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणे दुर्दैवी आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मात्र, भाजपने नकार दिल्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा थांबली. ही कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी चांगली बाब नाही, असे सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाइन बनत नाही म्हणून लोक टीका करतात. गडकरी आणि शरद पवार सातत्याने इथेनॉल आणि तत्सम विषयावर भाष्य करतात. ते राजकीय नाही तर सामाजिक विषय आहे. सध्या राज्यसभा निवडणुकीचा विषय प्राधान्याने आहे. त्या नंतर विधानपरिषद निवडणुकीचे पाहू. बऱ्याच गोष्टी आम्ही टीव्हीच्या माध्यमातून ऐकत असतो. लोक काय बोलतात याचा आढावा घ्यावा लागेल. हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. कोणी काही बोलत असेल तर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते त्याबद्दल विचार करतील, असे हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आरोप असलेला माणूसच आता माफीचा साक्षीदार होत आहे. अनिल देशमुख यांच्या घरी १०९ वेळा छापा टाकण्यात आला. हा कदाचित जागतिक विक्रम असेल. नेमका त्यांचा गुन्हा काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. नवाब मलिक यांच्यावर नागपूरच्या नेत्याने तीनशे कोटींचा आरोप केला. मग ५५ लाखांचा केला आणि आता पाच लाखाचा आकडा समोर आला आहे. नेमके खरे काय हेच कळत नाही.

Previous articleदहशत कोरोनाची । नागपूर विमानतळावर पुन्हा ट्रेसिंग अन् टेस्टिंग करणार, पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती
Next articleबारावीचा निकाल । 94.22 टक्के विद्यार्थी पास, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 टक्के निकाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).