Home Police Gadchiroli । गडचिरोलीत 119 आदिवासी जोडप्‍यांचे झाले ‘शुभमंगल’

Gadchiroli । गडचिरोलीत 119 आदिवासी जोडप्‍यांचे झाले ‘शुभमंगल’

  • – 16 आत्‍मसमर्पित नक्षलवादी व 103 आदिवासी जोडपे अडकले विवाहबंधनात
  • – पारंपरिक रितीरिवाजानुसार झाला मंगल सोहळा
  • – भव्‍य मिरवणुकीवर गडचिरोलीकरांनी केली पुष्‍पवृष्‍टी
  • – शिस्‍त, नियोजन आणि समयबद्धतेचे उत्‍तम उदाहरण

गडचिरोली ब्युरो : पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केलेले 119 आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्‍या साड्या परिधान केलेल्‍या 119 उपवधूंची भव्‍य मिरवणुक मुख्‍य रस्‍त्‍यातून निघाली तेव्‍हा गडचिरोलीकरांनी त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी केली. जागोजागी आदिवासी जोडप्‍यांचे औक्षण करून स्‍वागत करण्‍यात आले. आदिवासी परंपरेनुसार 16 आत्‍मसमर्पित नक्षल्‍यांसह 119 जोडप्‍यांचा रविवारी गडचिरोलीत आदिवासी परंपरेनुसार भव्‍य सामूहिक विवाह सोहळा पार पडला. अतिशय शिस्‍तबद्ध, नियाजनबद्ध आणि समयबद्ध या सोहळ्याचे गडचिरोलीकरांनी तोंडभरून कौतूक केले.

मैत्री परिवार संस्‍था नागपूर व गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नातून रविवारी गडचिरोली येथील अभिनव लॉनममध्‍ये हा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्‍साहात पार पडला. 119 जोडपी, त्‍यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्‍या संख्‍येने उपस्थित लोकांनी सामूहिक विवाहाचा भव्‍य मंडप फुलून गेला होता


क्षणचित्रे….
  • – धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्‍ली, हेटरी, भामरागड, सिरोंचा व आत्‍मसमर्पित नक्षल्‍यांचा विशेष नवजीवन असे एकुण 10 झोन करण्‍यात आले होते.
  • – उपवर, उपवधूंना, कपडे, पादत्राणे, संसारोपयोगी साहित्‍यासह नववधूला सोन्‍याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आदींचे झोननिहाय वितरण करण्‍यात आले.
  • – नवदाम्‍पत्‍य व नातेवाईकांची झोननिहाय नाश्‍ता जेवणाची व्‍यवस्‍था होती.
  • – नवदाम्‍पत्‍यांची सुमारे अडीच किलोमीटर भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. नागरिकांनी त्‍यांचे औक्षण करून स्‍वागत केले व त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी केली.
  • – पोलिसांनी घरचाच विवाह असल्‍याच्‍या आनंदात मिरवणुकीत नाचण्‍याची हौस पूर्ण करून घेतली.
  • – दहा वाजताच्‍या मुहूर्तावर तीन महिलांचा समावेश असलेल्‍या भुमकांच्‍या (पंडित) चमूने आदिवासी परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्‍न केला.
  • – काही जोडपी आधीपासूनच ‘लिव्‍ह-इन’ मध्‍ये राहत होती. त्‍यामुळे या आदिवासी जोडप्‍यांपैकी अनेकांना एक किंवा दोन मुले होती. त्‍यांची मुलेही त्‍यांच्‍या विवाहाची साक्षीदार ठरली.

रविवारी सकाळी सहा वाजताच लग्‍न मंडपात लगबग सुरू झाली होती. वर-वधू नटूनथटून बसले होते तर भूमक विवाह विधीची तयारी करण्‍यात व्‍यस्‍त होते. आठ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँडबाज्‍यांसह सुमारे अडीच किलोमीटर फिरून आल्‍यानंतर बरोबर दहा वाजता मुहूर्तावर भुमकांच्‍या मंत्रोच्‍चारात विवाह विधी पार पडले.

त्‍यानंतर झालेल्‍या कार्यक्रमाला आमदार देवराव होळी, आमदार कृष्‍णा गजभिये, गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक-अभियान सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्‍डा, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे, नगराध्‍यक्ष योगिता पिपरे, जिल्‍हा बँक अध्‍यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवारचे अध्‍यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल छाब्रा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुरके यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

शिवनाथ कुंभारे म्‍हणाले, विवाह करणे आताशा खूप खर्चिक झाले आहे. त्‍यातही गोरगरिबांचे विवाह म्‍हणजे कठीण कर्म होऊन बसले आहे. अशा स्थितीत मैत्री परिवार संस्‍थेने आदिवासी भागातील नागरिकांसाठी घेतलेला हा पुढाकार प्रशंसनीय आहे.

प्रास्‍ताविकातून प्रा. संजय भेंडे यांनी केले. त्‍यांनी मैत्री परिवारच्‍या कार्याचा आढावा घेतला व सामूहिक विवाहाबाबत विस्‍तृत माहिती दिली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी नवदाम्‍पत्‍यांना झोननिहाय संसारोपयोगी साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार यांनी केले. आभार प्रनिल गिल्‍डा यांनी मानले.

आदिवासी आमचेच कुटुंबिय

गडचिरोली जिल्‍हा हा नक्षली कारवायांसाठी ओळखला जातो. अतिसंवेदलशील अशा या जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत असतात. अशा नक्षली कारावायांना आळा घालण्‍यासाठी एकीकडे पोलिस विभाग प्रयत्‍न करीत असून दुसरीकडे पोलीस दादालोरा खिडकीच्‍या माध्‍यमातून लहान मुलांपासून ते ज्‍येष्‍ठांपर्यंत सर्वांच्‍या जीवनविकासासाठी सातत्‍याने झटत आहे. हे आदिवासी आमचेच कुटुंबिय असून त्‍यांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्‍य आहे, असे म्‍हणत गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी नवविवाहित जोडप्‍यांना सुखी आयुष्‍यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

Previous articleरसायअहमदनगरच्या श्रीगोंद्यातील प्रकार, नशास्त्रपाठोपाठ आज बारावीचा गणिताचा पेपर फुटला
Next articleव्‍याज दर घटवले तरी पीएफ खातेधारकांना मिळतो जास्त व्याज आणि सहा लाखांचा मोफत विमा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).