Home हिंदी 50 टक्केपेक्षा अधिक सिंचन झाले तरच आत्महत्या थांबतील : नितीन गडकरी

50 टक्केपेक्षा अधिक सिंचन झाले तरच आत्महत्या थांबतील : नितीन गडकरी

  • पश्चिम विदर्भ विकास परिषदेशी संवाद

  • पाणी जमिनीत डिपॉझिट करण्याचे आवाहन

नागपूर : शेतकर्‍यांचे 50 टक्केपेक्षा अधिक शेतीचे सिंचन होईल एवढे पाणी शेतकर्‍याला उपलब्ध झाले तर पश्चिम विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील व पश्चिम विदर्भाचे चित्रच बदलून जाईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

कमतरता आणि क्षमता याचे अध्ययन आवश्यक
ना. गडकरी पुढे म्हणाले, विकास करताना त्या क्षेत्राच्या कमतरता आणि क्षमता याचे अध्ययन होणे आवश्यक आहे. विकासात शेती आणि उद्योगाचे महत्त्व अधिक आहे. आजच्या स्थितीत कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी अत्यंत कमी आहे. त्यामुळे रोजगार नाहीत व दरडोई उत्पन्नही वाढत नाही. ‘वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन’ या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आपल्याकडे ऊर्जा आहे, पाण्याची कमतरता आहे, दूरसंचार साधने आहेत आणि दळणवळण क्षेत्रात आपण खूप कामे केली आहेत, असेही ते म्हणाले.

पाणी मिळणार नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही
जलसिंचनाच्या दृष्टीने आपण मागे आहोत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले, आपण 40 हजार कोटी महाराष्ट्राला सिंचनासाठी दिले. 60 हजार कोटी नदी जोड प्रकल्पाला दिले. जोपर्यंत शेतकर्‍याला 12 तास पाणी मिळणार नाही तोपर्यंत शेतकर्‍याचे उत्पन्न वाढणार नाही. रस्त्यांची कामे करताना जेवढे नाले व नद्या आहेत, त्या खोल करण्याचे काम आम्ही सुरु केले आहे. त्यामुळे जलसंधारण झाले आहे. बुलडाणा पॅटर्नचा उल्लेख ना. गडकरींनी यावेळी केला. बुलडाणा पॅटर्नचे काम वाशीम, अकोला या जिल्ह्यात व्हावे. उपलब्ध झालेले पाणी जमिनीत डिपॉझिट करा म्हणजे ते कधीही काढता येईल. जलसंधारणाचा मोठा कार्यक्रम पश्चिम विदर्भात राबवला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सॅटेलाईट पोर्ट द्वारे शेतकर्‍याचा माल निर्यात होणार
ब्रॉड गेज मेट्रो, बुलेट ट्रेन या मुद्यांकडेही ना. गडकरी यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच अकोला व अमरावती विमानतळ विकसित झाले तर पश्चिम विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. एक सॅटेलाईट पोर्ट सिंदी येथे व एक जालना येथे आपण निर्माण करीत आहोत. या द्वारे विदर्भातील शेतकर्‍याचा माल निर्यात करणे अत्यंत सुलभ होणार आहे, असे सांगून ते म्हणाले- खारपाण पट्ट्यात डाळींचे पीक चांगले होत आहे. या भागातील डाळींंना वेगळी चव आहे. त्याचे मार्केटिंग केले गेले पाहिजे. कापूस, नागपूर विभागात धान ही पिके अधिक होतात. पण गहू, तांदळाचा साठा आता पुरेसा आहे. त्यामुळे पीकपध्दतीबद्दल विचार करावा लागणार आहे. शेतकर्‍यांनी आपल्या विहिरीचे पाणी आणि शेतीची जमीन तपासावी. त्यानुसार कोणते पीक घेणे योग्य राहील याचा निर्णय घेता येईल. सेंद्रीय खताचा अधिक वापर करून, खर्च कमी करून उत्पन्न कसे अधिक घेता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. तेलबियांचे उत्पन्न अधिक येईल यासाठीही प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here