Home मराठी येत्या प्रजासत्ताक दिनापासून पर्यटकांशी बोलतील पेंच अभयारण्यातील झाडे अन् प्राणी

येत्या प्रजासत्ताक दिनापासून पर्यटकांशी बोलतील पेंच अभयारण्यातील झाडे अन् प्राणी

566

‘व्हिस्परिंग पेंच’ ॲपचे 26 रोजी होणार लोकार्पण

‘वनस्पतींना संवेदना असतात’ किंवा झाडांनाही जीव असतो याचा शोध जगदीशचंद्र बाेस यांनी लावला. एक दिवस संवेदना असणारी झाडे आपल्या भाषेत आपल्याशी खरोखरच बोलायला लागली तर किंवा जंगलातले सारे मुके प्राणी “ए भाऊ, जरा ऐक ना’ म्हणत स्वत:विषयी सांगायला लागले तर काय मजा येईल ना, असा विचार माणूस नेहमी करतो. पण, आता केवळ झाडेच नाही तर संपूर्ण पेंच अभयारण्यच पर्यटकांशी बोलणार आहे. तेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत!

२६ जानेवारीला प्राध्यापक सारंग धोटे यांनी विकसित केलेल्या “व्हिस्परिंग पेंच’ ॲपचे लोकार्पण होत आहे. हे अॅप गुगल “प्ले-स्टोअर’वर उपलब्ध होईल. नंतर पेंचमधील पशुपक्षी, दगडधोंडेही पर्यटकांशी बोलतील, स्वत:विषयी माहिती देतील. माणसांचा माणसांशी संवाद तुटत चाललेला असताना झाडे व पशुपक्ष्यांनी माणसांशी संवाद साधण्याच्या या प्रकल्पाचे कौतुक होत आहे.

“बोलके झाड’ ही संकल्पना रसायनशास्त्राचे प्रा. सारंग धोटे यांनी प्रत्यक्षात आणली. धोटे हे दर्यापुरातील जे. डी. पाटील सांगलूडकर महाविद्यालयात कार्यरत आहेत. धोटे यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच महाराष्ट्र यांच्या सहयोगाने एक नवीन अँड्रॉइड ॲप “Whispering Pench” विकसित केले. २६ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्प येथील अमलतास परिसरात लोकार्पण होणार आहे. हे ॲप अगदी नावीन्यपूर्ण असून प्रथमच पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र येथे येणाऱ्या पर्यटकांना दिसणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नुसतीच झाडे नाहीतर त्यासोबत येथील काही खडक, मारुती चितमपल्ली ग्रंथालय, गोंडूल सभागृह, मोगली सभागृह अशा अनेक गोष्टी या ॲपच्या माध्यमातून पर्यटकांशी बोलणार आहेत.

व्हिस्परिंग पेंच ॲप सर्वप्रथम पर्यटकांना डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. नंतर भाषा निवडायची, आपले नाव सांगायचे आहे. नंतर ज्या झाडाची किंवा इतर माहिती हवी असेल तेथे असलेला क्यूआर कोड स्कॅन करायचा. सगळी माहिती फोनवर दिसेल. झाड किंवा पक्षी बोलायला लागेल. शेवटी वाघाचे महत्त्व काय याचा संदेशसुद्धा असेल. या ॲपमध्ये ७० पेक्षा जास्त प्रजातींच्या झाडांची माहिती आहे. ॲप एकदा इन्स्टॉल केल्यावर विना इंटरनेटसुद्धा वापरू शकतो. हे ॲप तयार करण्यात प्रभू शुक्ल, अतुल देवकर, अजिंक्य भटकर आणि जयेश तायडे यांनी मार्गदर्शन आणि योगदान दिले आहे.

प्रा. सारंग धोटे यांच्या अॅपपासून प्रेरणा घेत रातुम नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाचे डाॅ. दीपक देवाजी बारसागडे यांनी “आय अॅम बटरफ्लाय’ हे अॅप तयार केले. यात विद्यापीठ परिसरातील ४२ प्रजातींच्या फुलपाखरांची माहिती आहे. क्यूआर कोड स्कॅन करताच ही फुलपाखरे आपले नाव घेऊन बोलतात.

Previous articleप्रजासत्ताकदिनी देशाच्या सहा राज्यांमध्ये एकसाथ निनादणार राष्ट्रगीताचा सूर
Next articleनए ओमिक्रॉन ने उड़ाई दुनिया की नींद, भारत समेत 40 देशों में दस्तक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).