Home हिंदी गर्ल इन ब्लॅक : बिहार ची सीएम् होण्यासाठी लंडनवरुन आली तरुणी

गर्ल इन ब्लॅक : बिहार ची सीएम् होण्यासाठी लंडनवरुन आली तरुणी

680

बिहारच्या विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आल्या आहेत. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये पुष्पम प्रिया चौधरी या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पुष्पम प्रियाने प्रचाराला सुरुवातही केली आहे. सध्या बिहारमध्ये तिच्या लूक्सचे आणि स्टाइलची तुफान चर्चा होत आहे. युवामध्ये ती खूपच लोकप्रिय होत आहे.

सध्या बिहारमध्ये भाजपा-जदयू आणि एलपीजीचे संयुक्त सरकार असून नितिश कुमार मुख्यमंत्री आहेत. याच सरकारला आता पुष्पम प्रिया यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेचा विषय ठरलेल्या या जाहिरातीमधूनच पुष्पम प्रिया यांनी आपल्या प्युरल्स या पक्षाची घोषणा केली होती. ‘एव्हरीवन गव्हर्न्स’ म्हणजेच प्रत्येकजण प्रशासक आहे अशा अर्थाचे पुष्पम प्रिया यांच्या ‘प्युरल्स’ या पक्षाचे घोषवाक्य आहे.

स्वत:ला मुख्यमंत्री पदाची उमेदवार घोषित केलं
याच वर्षी मार्च महिन्यामध्येच सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन पुष्पम प्रिया यांनी स्वत:ला बिहारच्या “मुख्यमंत्री पदाची उमेदवार” घोषित केलं होतं. जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असणाऱ्या पुष्पम प्रिया लंडनमध्ये राहायच्या. प्रिया आता निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतात दाखल झाल्या असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये सहा महिन्यांपूर्वीच जाहिरात देत पुष्पम प्रिया यांनी, ‘आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहोत,’ असं घोषित केलं होतं.

कोण आहे पुष्पम प्रिया?
26 वर्षीय पुष्पम प्रिया या मूळच्या दरभंगा येथील असून त्या लंडनमध्ये वास्तव्यास होत्या. पुष्पम प्रिया यांनी लंडनमधील लंडन स्कुल ऑफ इकनॉमिक्समध्ये पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्रीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रिया यांनी दिलेली जाहिरात छापून आली. या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वत:ला ‘मुख्यमंत्री पदाचा उमेदवार’ असं घोषित केलं होतं.

काळाच रंग का?
विशेष म्हणजे सध्या पुष्पम प्रिया यांच्या ब्लॅक रंगावरील प्रेमाबद्दल चर्चा सुरु असतानाच त्यांनी छापलेली जाहीरातही पूर्ण काळ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवरच होती. पुष्पम प्रिया या फक्त कपडे, मोबाईल आणि घड्याळच नाही तर अगदी नेलपेंटही काळ्याच रंगाची लावतात. एका ठिकाणी पत्रकरांनी जेव्हा पुष्पम प्रिया यांना काळ्या रंगाच्या ड्रेससंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पत्रकारांना, “इतर नेते कायम पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?,” असा प्रति प्रश्न केला होता. त्या म्हणतात राजकारण्यांनी कसे कपडे घालावेत हे संविधानामध्ये सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ज्याला जे आवडेल ते त्याने परिधान करावं, असं आपल्या स्टाइलबद्दल बोलताना पुष्पम प्रिया सांगतात