Home Education #Maharashtra । नव्या व्हेरिएंटचे संकट; शाळांबाबत आज निर्णय, आफ्रिकेतून येणारे प्रवाशी 14...

#Maharashtra । नव्या व्हेरिएंटचे संकट; शाळांबाबत आज निर्णय, आफ्रिकेतून येणारे प्रवाशी 14 दिवस क्वॉरंटाइन

522

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात तत्काळ परिणाम होण्याची चिन्हे नसली तरीही राज्य सरकार सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना मनाई करावी, अशी सूचना राज्य सरकारने केंद्राला केली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेने विशेष खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वॉरंटाइन करण्याचा तसेच दर ४८ तासांनी कोरोना चाचणी करण्याचे नवे निर्देश शनिवारी जाहीर केले.

एकीकडे १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असतानाच नव्या व्हेरिएंटचे संकट उद्भवल्याने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार असून त्यात शाळांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमान बंद केली पाहिजे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे यात सध्यातरी काही बदल नाही. कारण हा व्हेरिएंट फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. तरीही रविवारी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री टोपे म्हणाले.

तपासणीत नवा व्हेरिएंट नाही

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळलेला नाही. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून महिन्याला १०० नमुने तपासणीसाठी घेतो. ३६ जिल्ह्यांतून ३६०० नमुने येतात. यात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आहे की नवा अन्य व्हेरिएंट आहे हे तपासले जाते. ओमिक्राॕॅनची चर्चा आता होते आहे. आम्ही मात्र ही जीनोमिक तपासणी सातत्याने करतो आहोत, असेही टोपे म्हणाले.