Home Crime #nagpur । नागपुरात 70 किलो वजनाची तिजोरी घेऊन पळाले, नगरसेवकाच्या घरी धाडसी...

#nagpur । नागपुरात 70 किलो वजनाची तिजोरी घेऊन पळाले, नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी

484

नागपूर ब्युरो : नागपुरात प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी जवळपास 32 लाख रुपयांचे मौल्यवान दागिने लांबविले आहेत. विशेष म्हणजे घरात नोकरचाकर आणि इतर कुटुंबिय असताना चोरट्यांनी एवढ्या मोठ्या रकमेची धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या घरात चोरी होऊ शकते तर मग सर्वसामान्यांचं काय? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण या घटनेमुळे स्थानिकांकडून पोलिसांच्याही कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवक संदीप गवई यांचं सेमिनरी हिल्स परिसरात मोठं घर आहे. त्यांच्या घरातील एका बेडरुममध्ये एक 70 किलो वजनाची तिजोरी होती. त्या तिजोरीत दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. जवळपास 32 लाख रुपयांचा ऐवज त्या तिजोरीत होता. संदीप गवई काही कामानिमित्ताने आपल्या पत्नीसह मुंबईत आले होते. याच दरम्यान चोरट्यांनी घरात शिरुन हात साफ केला. मुंबईहून घरी पोहोचल्यानंतर गवई यांना बेडरुममध्ये तिजोरी दिसली नाही. गवई आणि त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पण ती तिजोरी घरात सापडत नव्हती. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. आपल्या घरातील दागिन्यांची तिजोरीसह चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

चोरी करणारा कुणीतरी ओळखीचा असल्याचा अंदाज

विशेष म्हणजे संबंधित चोरीची घटना ज्या रात्री घडली त्यावेळी घरात घरातील इतर सदस्य आणि नोकरही होते. मात्र रात्रीच्या वेळी हा सगळा प्रकार घडला आणि चोरट्यांनी कुठलीही तोडफोड न केल्याने कोणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चोरट्यांनी बरोबर संदीप गवई यांच्या बेडरुममधील तिजोरीच कशी लांबवली? त्यांनी घरातील इतर ठिकाणी काहीच शोधाशोध का नाही केली? घरात असणाऱ्यांना चोर घरातून 70 किलो वजनाची तिजोरी दागिन्यांसह घेऊन जाण्यापर्यंत काहीच आवाज आला नसेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच चोरी करणारा कुणीतरी ओळखीचा असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय. याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे. पण चोरट्यांना पकडणं हे पोलिसांपुढे देखील मोठं आव्हान आहे.

#Nagpur । नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदारांचे एक हाती वर्चस्व, 18 पैकी 18 जागेवर विजय

Previous article#nashik | Income Tax Department conducts searches in Nashik
Next article#maharashtra । यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीतर्फे कौतूक सोहळा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).