Home Maharashtra स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव । गडकरी म्हणाले- ‘विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावा, शाळेत चित्रपट...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव । गडकरी म्हणाले- ‘विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावा, शाळेत चित्रपट दाखवा’

628
नागपूर ब्युरो : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागपूर महापालिका शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करुन द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल ज्ञान वाढवावं, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केल्या.

नितीन गडकरी नागपुरात महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. विशेष म्हणजे हे वर्ष “विश्वविजयी तिरंगा प्यारा” या झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्त यांची 125 व्या जयंतीचे ही वर्ष आहे. त्यानिमित्ताने महानगरपालिकेने आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी सामूहिक झेंडा गीताचे गायन ही आयोजित केले होते.

विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची गोडी लावा

नागपूरच्या संविधान चौकात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही सामूहिक झेंडा गीताच्या गायनात सहभागी झाले. विद्यार्थीदशेत अशा कार्यक्रमांचा अनुभव विद्यार्थ्यांना इतिहास संदर्भात गोडी निर्माण करणारा ठरतो, असं गडकरी म्हणाले.

गौरवशाली इतिहासावर आधारित चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवा

महापालिकेच्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव शिक्षकांनी करुन द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. इतरही माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल माहिती गोळा करावी, वाचन करावं, ज्ञान वाढवावं, असं गडकरी म्हणाले. संविधानाच्या शिलालेखाचं उदघाटन झालं. ज्या चौकात बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याच्या समोर संविधान शिलालेख निर्माण झाला हा सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या गौरवशाली इतिहासात याची नोंद होईल, असंही गडकरी म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा व्हावा

प्रत्येक वस्तीत आझादीच्या 75 वर्षाचा कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. मी विद्यार्थी होतो तेव्हा स्वातंत्र्य या विषयावर अभ्यास केला आणि त्यावेळी मला पुरस्कार मिळाला. लोकांच्या मनात देशप्रेम जागविणे आपलं काम आहे, असंही गडकरी म्हणाले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेली संविधानाची उद्देशिका नागरिकांना संविधानाचं महत्त्व पटवून दिलं.