Home Business राष्ट्रीय निर्यातीतला महाराष्ट्राचा सध्याचा 20% वाटा वाढवण्याची आवश्यकता: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

राष्ट्रीय निर्यातीतला महाराष्ट्राचा सध्याचा 20% वाटा वाढवण्याची आवश्यकता: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

518

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून दोन दिवसीय वाणिज्य उत्सव निर्यात परिषदेला मुंबईत प्रारंभ

मुंबई ब्युरो : महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर अर्थात जागतिक व्यापार केंद्र इथे केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्टाच्या उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत वाणिज्य उत्सव निर्यात परिषदेचे उद्‌घाटन केले. विदेश व्यापार महा संचालनालय,वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि उद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उदयाला येणारी आर्थिक शक्ती म्हणून भारताचे दर्शन घडवणे ही या दोन दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे सहाय्य, निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्र, अन्नप्रक्रिया क्षेत्र, निर्यात संधी यासारख्या विषयावर पॅनेल चर्चाही या कार्यक्रमात होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आर्थिक वृद्धी आणि भारतातून निर्यातीला प्रोत्साहन यांना केंद्र स्थानी ठेवून वाणिज्य मंत्रालय 20 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात ‘वाणिज्य सप्ताह’ साजरा करत आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्‌घाटन पर भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रम आणि निर्यातीला चालना आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली. भारत आर्थिक महासत्ता व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत ही जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरल्याचे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर्स करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टासह आत्मनिर्भर भारत अभियान सुरु करण्यात आल्याचे ते म्हणाले. या अंतर्गत आपल्याला निर्यात वाढवतानाच आयातीवरचे अवलंबित्व कमी करायला लागेल असेही त्यांनी सांगितले. 2021- 22 या वित्तीय वर्षात निर्यात उद्दिष्ट 400 अब्ज डॉलर्स ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय निर्यातीत राज्याच्या वाट्याबद्दल बोलताना त्यांनी राष्ट्रीय निर्यातीतला महाराष्ट्राचा सध्याचा 20 % वाटा आणखी वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली.निर्यातीला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका असलेले सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दृढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. बँकिंग,कृषी,कामगार आणि सामाजिक यासारख्या क्षेत्रात केंद्र सरकार सुधारणा आणत असून उद्योग जगताने त्याची प्रशंसा केल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, “राष्ट्राच्या जीडीपी तसेच निर्यातीत महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका आणि वाटा आहे. तसेच भविष्यात देशाच्या निर्यात वृद्धीत महाराष्ट्र आघाडीवर राहील.”

उद्योग आणि खनिकर्म राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “ही परिषद महाराष्ट्रातील निर्यातीला वेगळ्या स्तरावर प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी मदत करेल.सूक्ष्म ,लघु , मध्यम, मोठ्या औद्योगिक क्षेत्रांच्या बाबतीत महाराष्ट्राने अग्रणी भूमिका बजावली आहे. ही परिषद आम्हाला मत्स्यव्यवसाय, कृषी आणि वस्त्रोद्योग यांना इतर उद्योगांसारखी एकत्र आणण्यास आणि संबंधित क्षेत्रातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करेल.”

उद्योग प्रतिनिधी आणि राज्य आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपली निर्यात वाढवण्याची प्रचंड क्षमता महाराष्ट्रात आहे.या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात अन्न, अभियांत्रिकी, वस्त्र, चामडे, रसायने आणि औषध निर्मिती, रत्ने आणि दागिने, हस्तकला आणि सेवा क्षेत्र जी महाराष्ट्रातून निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात अशा विविध क्षेत्रांसंबंधी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा समाविष्ट आहेत . हा कार्यक्रम अधिक सखोल माहितीपूर्ण करण्याकरिता, महाराष्ट्र राज्याच्या निर्यातक्षम क्षेत्रांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय डीजीएफटी, सीमाशुल्क, वाणिज्य दूतावास, पायाभूत सुविधा क्षेत्र आणि इतर अनेक वित्तीय संस्थांसारख्या संबंधित संस्थांशी चर्चा केली जात आहे.

Previous articleखासदार कृपाल तुमाने । नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांना लिहिले पत्र
Next articleBollywood News | थ्री इडियट्स से लेकर तुम्हारी सुलु जैसे हिंदी सुपरहिट फिल्मों का साउथ में बन चुका है रीमेक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).