नागपूर ब्युरो : मागील वर्षी प्रमाणे यावर्षी पावसाने सुरवातील दगा दिला तर ऑगस्टच्या अखेरीस सुरू झालेला पाऊसाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. ऑगस्टच्या अखेरीपासून सप्टेंबऱच्या मध्यपर्यंत सरासरीपेक्षा अधिक आणि गरजेपेक्षा अतिरिक्त पाऊस झाला असून जिल्ह्यात ओला दुष्काळाचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि. 20 सप्टेंबर) 109 टक्के पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सरकारी नियमानुसार 110 टक्केहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याची माहिती असून अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.
नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यात मान्सून व पर्जन्यमानाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून दिली. खासदार तुमाने म्हणाले, जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी सर्वात कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र यावेळी या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत 119 टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय हिंगणा, कळमेश्वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित 6 पैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या 4 तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढावणार आहे.
शासकीय निकषानुसार ज्या तालुक्यात 110 मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल अशा तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडतो. नागपूर जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत सरासरी 1064.1 मिमी. तर सप्टेंबरअखेर पर्यंत 101.01 टक्के सरासरी 920.4 मिमी. पाऊस पडतो. परंतु यावर्षी जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंतच 108.27 टक्के 929.7 मिमी. पाऊस झाला आहे. तब्बल 7 तालुक्यांमध्ये 110 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पिके झाली खराब शेतकरी अडचणीत
जिल्ह्यात 2,10,944 हेक्टरात कापूस, 92,764 हेक्टरात सोयाबीन, 63,917 हेक्टरामध्ये तूरीची तर 93,821 हेक्टरात धानाची लागवड झाली. तसेच हजारो हेक्टरात संत्रा व मोसंबीचे पीक आहे. मागील 20 दिवसात सुमारे 300 मिमी. पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे.
अनेक गावांत अतिवृष्टी
जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली नरखेड तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संत्रा पिकावर विविध रोग आले आहेत. रामटेक तालुक्यात अनेक गावांत अधिकचा पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मात्र, जिल्हा प्रशासन पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी पुन्हा उघड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती (दि. 20 सप्टेंबर)
तालुका मिमी. टक्के
- नागपूर शहर 1128.4 128.4
- नागपूर ग्रामीण 963.7 107.17
- कामठी 1002.6 112.8
- हिंगणा 1070.4 133.53
- रामटेक 823.3 89.16
- पारशिवनी 651.9 75.31
- मौदा 919.1 93.43
- काटोल 859.3 119.08
- नरखेड 888.7 119.32
- सावनेर 947.2 118.4
- कळमेश्वर 982.7 116.93
- उमरेड 848.3 92.28
- भिवापूर 1064.1 110.69
- कुही 933.7 105.18