Home मराठी Special। दुर्गम भागातील आदिवासी ग्रामिणांच्या आयुष्यात बदल घडवतोय “Lake Man” अनिकेत

Special। दुर्गम भागातील आदिवासी ग्रामिणांच्या आयुष्यात बदल घडवतोय “Lake Man” अनिकेत

भारतीय राजकारणात घराणेशाहीला मोठा इतिहास आहे. पण समाजकार्यात अशी उदाहरणे फार कमी. ज्यांनी समाज कार्याचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. आपला वारसा चालविण्यासाठी आई वडिल आपल्या मुलांना पुढे करतात परंतु आमटे कुटुंबियातील दुसर्‍या आणि तिसर्‍या पिढीने स्वतः हून पुढे येत हा वारसा यशस्वीपणे पुढे नेला.

बाबा आमटेंनी वनवासींना मुख्य प्रवाहात आणावे,अशी इच्छा बोलून दाखवली आणि डॉ. प्रकाश आमटेंनी ते शिवधनुष्य उचललं. रॅमन मॅगसेसे विजेते बाबा आमटे आणि प्रकाश आमटे पहिले पिता पुत्र असावे. याच समाजकार्याची पालखी आमटे कुटुंबीयांतील तिसरी पिढी डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे पुढे नेत आहे.ज्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. वकिलाचा मुलगा वकिल होतो त्याप्रमाणे समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होईल असंच नाही. याला कारण म्हणजे समाजसेवकाला मिळणारं मानधन आणि मान-सन्मान. मात्र आमटे कुटुंबियांनी हे विधान साफ खोडून टाकलं आहे. आज बाबा आमटेंची तिसरी पिढी समाजसेवेच्या कार्यात आहे. सोशल मीडिआ आणि फील्ड वर खूप सक्रिय असणारा अनिकेत लोकबिरादरी प्रकल्पाचे नाव घेताच सर्वांच्या ध्यानी येतो. आज अनिकेतचा वाढदिवस आहे. त्याला “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” कडून खूप खूप शुभेच्छा.


डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊनही आज हेमलकसा सारख्या दुर्गम भागात तो कार्य करत आहे.

तो आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा एक संचालक आहे. अनिकेत प्रकाश आमटे यांना जीएस महानगर को-ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेसाठी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

हेमलकसा इथून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग. आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव अनिकेत यांनी.


अनिकेत ला “lake man” असं सुद्धा म्हणता येईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये ग्रामिणांच्या मदतीने तलाव खोदले. दर वर्षी उन्हाळ्यात या भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागायचे, मात्र आता अनेक गावात खोदण्यात आलेल्या या तलावांमध्ये भरपूर पाणी दिसू लागले आहे.

अनिकेत म्हणतो, चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. वनवासींना सक्षम करणे आणि त्यांचे हक्क त्यांना कळावे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. तसेच गावाचा विकास करून चांगले उद्योगधंदे आले पाहिजे यासाठी कार्यरत आहोत.

अनिकेत आपल्या ध्येयांबद्दल बोलतांना म्हणतो, आजोबांनी बाबांना सांगितले की, वनवासींना मुख्य प्रवाहात आणणं हा मुख्य उद्देश आहे. तोच उद्देश घेऊन आम्ही पुढे जातोय. शिक्षण ही काळाची गरज असून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. काही जिल्हा परिषद शाळांची अवस्था फार बिकट आहे. बरेच शिक्षक पगार घेतात पण दर्जेदार शिक्षण देत नाही. त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. यामुळे देशाचा विकास होत नाही. आणि यात एक संस्था एक शाळा फार मोठे काम करू शकत नाही. फक्त उदाहरण निर्माण करू शकतं. मोठ्या प्रमाणावर काम फक्त शासनच करू शकतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here