इस्रोच्या टीमने चंद्रपूर परिसरात शुक्रवारी केली घटनास्थळाची पाहणी
चंद्रपूर जिल्ह्यात २ एप्रिल रोजी आकाशातून पडलेल्या अवशेषांची तपासणी करण्यासाठी इस्रोची टीम शुक्रवारी सिंदेवाही येथे आली होती. या टीमने पोलिसांच्या ताब्यातील अवशेषाची तपासणी करून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, हे अवशेष सखोल तपासणीकरिता इस्रोच्या बंगळुरू येथील प्रयोगशाळेत शुक्रवारी रात्रीच नेण्यात येणार असून आठवडाभराच्या अभ्यासानंतर नेमका काय प्रकार आहे, हे स्पष्ट करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २ एप्रिल रोजी कोसळलेल्या सॅटेलाइटच्या बूस्टरच्या तुकड्यांची “इस्रो’ ने दाखल घेतली. तिरुवनंतपुरम येथील अवकाश संस्थेचे वैज्ञानिक एम. शाहजहान आणि मयूरेश शेट्टी हे अवशेष पाहण्यासाठी सिंदेवाही येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी रिंग पडलेल्या लाडबोरी गावात जाऊन घटनास्थळाची आणि गोळा केलेल्या रिंग व सिलिंडर्सची पाहणी केली. त्याचे फोटो, व्हिडिओ काढले. सिंदेवाही, ब्रह्मपुरी व चिमूर तालुक्यात परिसरात तर वर्धा जिल्ह्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरात सॅटेलाइटचे अवशेष आढळून आले होते. याबाबत आठवड्यात अहवाल येणार आहे.