Home मराठी Nagpur । चक्क नागपूरच्या रस्त्यावर फिरत होते 22 किलो वजनाचे दुर्मीळ कासव…!

Nagpur । चक्क नागपूरच्या रस्त्यावर फिरत होते 22 किलो वजनाचे दुर्मीळ कासव…!

नागपूर ब्युरो : 29 जूनच्या रात्री सुमारे 22 किलो वजनाचे आणि दक्षिण भारतातच आढळणारे एक कासव चक्क रस्त्यावर फिरताना आढळले. वनविभागाने या कासवाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला दिले. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कासव एकदम ठणठणीत असल्याची माहिती सेंटरने दिली आहे.

29 जूनला हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना हिंगणा येथील रहिवासी व पत्रकार गजानन ढाकुलकर यांनी एक भला मोठा कासव कॉलनीच्या रस्त्यावर चालत असल्याचे कळवले. त्या नंतर आशिष निनावे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. कासवाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेन्टरमध्ये वैद्यकीय तपासणी करीता आणले.

बुधवारी ट्रान्झिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशुपर्यवेक्षक सिद्धांत मोरे यांनी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात व संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. हा कासव आपल्याकडे दुर्मीळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन 22 किलो 200 ग्रॅम असून त्याची लांबी 87 सेंमी व रुंदी 51 सेंमी आहे. शरीराचा संपूर्ण घेर 165 सेंमी इतका आहे. लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल.