मुंबई ब्युरो : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरातील निवासस्थानी सुद्धा छापेमारी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.
सचिन वाझेचाही तळोजा कारागृहातून जबाब
दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.
टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.