Home Health Aamchi Mumbai । झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?

Aamchi Mumbai । झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?

मुंबई ब्युरो : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये एकही कंटेनमेंट झोन उरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील झोपडपट्ट्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

मुंबईत सद्यस्थितीत पालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन नाही. तर एका वॉर्डमध्ये एक, दोन वॉर्डमध्ये 2, एका वॉर्डमध्ये 3 अशा सहा प्रभागांत फक्त 22 प्रतिबंधित क्षेत्रे शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. मुंबईतील सहा वॉर्डमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत.

कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?
  • के/पूर्व – अंधेरी पूर्व – 8
  • आर/दक्षिण – कांदिवली – 6
  • एस – भांडूप – 3,
  • टी – मुलुंड – 2
  • एम/पश्चिम – चेंबूर – 2
  • ई – भायखळा – 1
इतर भागात किती कंटेनमेंट झोन?

तर दुसरीकडे कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पालिकेसाठी आव्हान ठरलेल्या उत्तर मुंबईतील आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर, पी/दक्षिण गोरेगाव, पी/उत्तर मालाड, के/पश्चिम अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्टय़ांमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन उरलेला नाही.

याशिवाय ए वॉर्ड, बी डोंगरी, सी चिराबाजार, काळबादेवी, डी ग्रँटरोड, एफ उत्तर शीव-वडाळा, पिंग सर्कल, एफ दक्षिण परळ, एल्फिन्स्टन, जी/उत्तर धारावी, दादर, माहीम, एच पूर्व वांद्रे पूर्व, एच/पश्चिम वांद्रे पश्चिम, एल कुर्ला, एन घाटकोपर या वॉर्डमधील झोपडपट्टय़ांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याची कारण काय?
  1. मुंबईत गेल्या मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीसह कुर्ला, वरळी कोळीवाडे, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रय़ाच्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागात ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाला होता. त्यामुळे हा संसर्ग कसा रोखायचा असा सवाल पालिकेसमोर निर्माण झाला होता.
  2. मात्र पालिकेने ‘मिशन झिरो’सह ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आला. घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझर, जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला.