Home मराठी Gadchiroli । जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

Gadchiroli । जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

गडचिरोली ब्यूरो : सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करित साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

यावर्षी दि.13 एप्रिल 2021 पासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि.13 किंवा 14 मे 2021(चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाच्या दि. 13 एप्रिल 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र. 1, 2, 7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-19 या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम 144 लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे गरजेचे आहे अशा सूचना देणेत आल्या आहेत.

Previous articleMaharashtra । राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या : नाना पटोले
Next articleNagpur | सदर के 2 कोचिंग इंस्टीट्यूट पर डीसीपी का छापा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).