Home Maharashtra Chandrapur । चंद्रपुरचा पारा 43.3 अंशांवर, जगातील चौथ्या क्रमांकाचे उष्ण शहर

Chandrapur । चंद्रपुरचा पारा 43.3 अंशांवर, जगातील चौथ्या क्रमांकाचे उष्ण शहर

चंद्रपूर ब्युरो : चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 43.8 अंशांवर पोहोचला आहे. या मोसमातील हे आत्ता पर्यंत चे सर्वात जास्त तापमान आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हे देशातील नाही तर जगातील उच्चंकी तापमान असलेल्या शहरात चौथ्या क्रमांकावर पोहचले आहे. तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले असून लोकांचं जनजीवन प्रभावीत झालं आहे.

एकाच आठवड्यात तापमान वाढले

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपुरचे तापमान 38 अंशांच्या घरात होते. मात्र एकाच आठवड्यात तापमानाने उसळी घेत 44 अंशांचा टप्पा गाठला आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मध्य भारतात ही उष्णता वाढ झाल्याचे विशेषज्ञांचं मत आहे. या सोबतच चंद्रपूरमध्ये असलेल्या कोळसा खाणी आणि उद्योग यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाल्यामुळे देखील या तापमान वाढीला हातभार लागत आहे आणि तापमानात मोठी वाढ होत आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ बसत आहे. दरवर्षी चंद्रपूर येथे सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका पाचव्यांदा ‘हीट ऍक्शन प्लॅन’ राबविणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले आहेत. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होत आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

मुंबईत पारा 40 अंशांवर

हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईचा पारा 27 मार्चला 41.7 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 1956 च्या सुमारास करण्यात आली होती. ज्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात जाणवू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेनं जे कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे.

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहातं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत.