Home Maharashtra गृहमंत्री अनिल देशमुखांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कशाची केली मागणी?

गृहमंत्री अनिल देशमुखांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कशाची केली मागणी?

मुंबई ब्युरो : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी माझी चौकशी करावी अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे कळत आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे.त्यामुळे लवकरच चौकशी आयोगाची घोषणा होणार आहे.

तर दुसरीकडे, खुद्द अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. ‘परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते’ असं अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर फक्त कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच उपस्थितीत सर्व मंत्र्याशी महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत अर्थातच भाजपकडून सातत्याने होत असलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत गेल्या आठवडाभरात भाजपने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. भाजप आरोपांची राळ उठवत असेल तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भूमिका घ्यावी, याविषयी चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. त्याच बरोबर भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी यांच्याबाबत निर्णय घ्यावा याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.