Home Health वाशिम जिल्ह्यात १ मार्च रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण

वाशिम जिल्ह्यात १ मार्च रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण

Shanmugrajan S, Collector, Washim

आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जावून वितरण

वाशिम ब्यूरो (इरशाद अहमद): जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ मार्च २०२१ रोजी जंतनाशक गोळ्यांचे घरोघरी जावून वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज, २६ फेब्रुवारी रोजी झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक खबरदारी घेवून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जंतनाशक गोळी वाटपाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग यांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.

डॉ. आहेर म्हणाले, एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळ्या दिली जात आहे. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याद्वारे १ मार्च रोजी जंतनाशक गोळी घरपोच देण्यात येणार आहे.

असे असणार डोज, कोणताही दुष्परिणाम नाही

१ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पावडर करून देण्यात येईल, तसेच २ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक गोळी चावून खाण्यासाठी देण्यात येणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. जिल्ह्यातील सुमारे ३ लक्ष ३९ हजार ३८३ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून जिल्ह्याला ६ लाख गोळ्या प्राप्त झाल्या असून त्याचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले आहे. १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन झाल्यानंतर यादिवशी ज्यांना गोळ्यांचे वाटप झालेले नाही, अशा मुलांना ८ मार्च रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here