जेष्ठ समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रकाश बाबा आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 72 वर्षीय आमटे यांना पुढील उपचारासाठी नागपूर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमटे यांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. पण त्यांची RT-PCR चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली. त्यानंतर सुद्धा त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि पुन्हा चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आमटे यांना त्यांच्या समाजकार्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आनंदवन, लोकबिरादारी आणि सोमनाथ प्रकल्प काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. तर सध्या नागपूरातील एका रुग्णालयात प्रकाश आमटे यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
प्रकाश आमटे आपल्या पत्नीसह गेली चार दशके आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजिविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये काम करत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये अनाथ जंगली प्राण्यांसाठी अनाथालय चालवतात. 1973 साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली.