Home कोरोना Nagpur। कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा – डॉ. संजीव कुमार

Nagpur। कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा – डॉ. संजीव कुमार

571

नागपूर ब्युरो : कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ असल्यामुळे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेवून त्यांची प्राधान्याने कोविड तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.


नागपूर जिल्ह्यात अत्यंत जोखमीचे बाधित तसेच कमी जोखमीचे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून एका व्यक्तीमागे संपर्कात आलेल्या किमान दहा लोकांचा शोध घेवून त्यांची कोविड तपासणी करावी, असे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिलेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आर.पी.सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, उद्योग सहसंचालक धर्माधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • कोरोना उपाययोजनाबाबत आढावा
  • गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करा
  • बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची सक्तीने तपासणी

विभागात विशेष नागपूर जिल्हयात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नियमांचे कठोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक समारंभ यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे सक्तीने पालन करताना ग्रामीण अथवा शहरी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतानाच प्रत्येक नागरिकाने सक्तीने मास्कचा वापर करावा. यासाठी पोलीस व महानगर पालिकेने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेताना अत्यंत जोखमीचे व कमी जोखमीचे असलेले रुग्णांच्या संपर्कातील अत्यंत कमी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून ती थांबवण्यासाठी किमान दहा ते पंधरा व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी आवश्यक आहे. जिल्ह्यात 59 कंटोन्मेंट झोन असून या झोनचे मॉयक्रो प्लानिंग करुन आरटीपीसीआर व अँटीजेन तपासणीची संख्या वाढवावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत.

कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये तसेच कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जनतेला केले आहे.

फायर व सेफ्टी ऑडीट तात्काळ करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे सेफ्टी व फायर ऑडीट प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या इमारतींचेही फायर व सेफ्टी ऑडीट बंधनकारक आहे. सेफ्टी ऑडीटसाठी लागणारा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथवा जिल्हा नियोजन विकास निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी अतिरिक्त निधीची मागणीसुध्दा प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिलेत.

अपेक्षित वाढ लक्षात घेवून नियोजन

जिल्ह्यात कोविड रुग्णांवर उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व रुग्णालयात ऑक्सीजनसह आवश्यक औषधींचा मुबलक पुरवठा असावा यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून, रुग्ण संख्येतील अपेक्षित वाढ लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन

ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करण्यात येत असून, मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून, कुठल्याही कारणासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महसूल तथा पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागपूर शहर व ग्रामीण भागात दररोज साडेसहा हजार आरटीपीसीआर तपासणी होत असून, त्यात दहा हजारापर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

Previous articleNagpur | खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी
Next articleMaharashtra । काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्य़ासाठी ‘संकल्प अभियान’ राबवणार : एच. के. पाटील
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).