Home मराठी Maharashtra । पवारांवरील सततच्या टीकेमुळे जयंत पाटील संतापले

Maharashtra । पवारांवरील सततच्या टीकेमुळे जयंत पाटील संतापले

349
0

सांगली ब्युरो : कोथरूडमधील एका महिलेने मजबूत केलेल्या मतदार संघात जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे आयत्या बिळात नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ? अशी बोचरी टीका जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तसेच चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरील टीका थांबवावी असे आवाहनही त्यांनी केले.


सांगली येथील भावे नाट्य मंदिरात जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात जाणारे स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि आदर्श शाळा उपक्रमाचा उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुण्यातील चांगले काम करणाऱ्या एका महिलेने कोथरूड मतदारसंघ मजबूत केला होता. माजी आमदार मेधा कुलकर्णी विकासकामांच्या जोरावर मतदार संघावर जोरदार पकड निर्माण केली.

पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असे सांगणाऱ्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदार संघात निवडणूक लढवावी लागली. ज्यांनी मतदार संघात पकड निर्माण केली त्या मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून चंद्रकांतदादा यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत दादा हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ आहे. स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मतदारसंघ न मिळणे यावरून त्यांची जिल्ह्यातील ताकद काय आहे, ते दिसून येते,’ असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पडळकर यांच्या बोलण्यातून भाजप किती खालच्या स्तरावर गेलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यामुळे वरिष्ठ नेते हताश झाले आहेत. त्यामुळे पक्षच नैराश्यात असल्याचे दिसत आहे. खालच्या स्तरावर जाऊन विरोधकांवर टीका केली जात असताना त्या पक्षाला काही वाटत नाही हे दुर्दैवी आहे. त्यांना पक्षाची चिंता वाटू लागली आहे.

भाजप हा पक्ष कसा टिकवायचा अशी समस्या भेडसावत असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. प्रसिद्धीच्या मोहापायी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. चुकीचे बोलणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवारांवरील होत असलेली टीका थांबावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here