Home Maharashtra Maharashtra । 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विविध भागांत वादळी पावसाचे सावट

Maharashtra । 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विविध भागांत वादळी पावसाचे सावट

332
0

शेतकऱ्यांनी नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे

नागपूर ब्युरो : 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये दुपार नंतर येणाऱ्या वादळी पावसाचा अंदाज इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील इतर भागांत 16 ते 19 दरम्यान आभाळी हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे.

16 तारखेला पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांत कमी प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही, तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज नाही.

17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे, आणि या भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील अधिक राहणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या दिवशी औरंगाबाद, खानदेश आणि पश्चिम-महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाची फार शक्यता नसणार.

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल.

19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here