Home कोरोना Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी रंगीत...

Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी रंगीत तालिम

नागपूर / मुंबई ब्यूरो : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. आज राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली जाणार आहे.

नागपुर : आरोग्य सेविकांपासून ड्राय रनला सुरुवात

नागपुरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेतला जात आहे. मनपाच्या के टी नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ही रंगीत तालीम घेतली जात आहे. आज सकाळी प्रीतमा साखरे आणि कल्याणी कोटांगले या आरोग्य सेविकांपासून या ड्राय रनला सुरुवात झाली. हात सॅनिटाईज करणे, तापमान मोजणे, यादीत नाव तपासणे, आयडी तपासणे, कोवीनअँप वर नाव तपासून प्रत्यक्ष लसीकरण नंतर अर्धा तास निरीक्षण अशी ही प्रक्रिया आहे. ज्या आरोग्य सेविकांची नोंदणी करत त्यांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे, त्यांनी सरकारला धन्यवाद दिले, आम्ही कोरोना संकटाच्या काळात फ्रंटलाईनमध्ये काम केले, संकटाला सामोरे गेले आणि जेव्हा लस आली शासनाने आमची आठवण ठेवली याचे समाधान वाटत असल्याचे मत लाभार्थी आरोग्य सेविकांनी व्यक्त केले.

जालना : आरोग्यमंत्री टोपेंकडून ड्राय रनचा डेमो

कोविडच्या लसीकरणाची जालन्यामध्ये रंगीत तालीम घेतली जात आहे. जालन्यात स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे यावेळी उपस्थित आहेत. त्यांनी यावेळी ड्राय रनचा डेमो दाखवला. आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. दरम्यान जालन्यात रंगीत तालिमेची तयारी देखील पूर्ण झालीय. इमारत पूर्ण सजवलेली आहे.

पुणे : तीन केंद्रांवर प्रक्रिया

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यात समावेश असून पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोविड पोर्टलवर नोंद केलेल्या व्यक्तीला टेक्स्ट मेसेज द्वारे लसीकरणासाठी कधी आणि किती वाजता यायचं हे कळवले जाणार आहे.

नंदुरबार : खबरदारी घेतली जाणार

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण जेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होईल तेव्हा इंटरनेट सेवा, आणि वीज सुरू राहील यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. जनरेटरने वीज उपलब्ध केली जाईल शिवाय मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही, यासाठी मोबाईल कंपनीशी सम्पर्क साधला जाईल. पहिल्या टप्प्यात 13 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुडे यांनी दिली आहे. नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर ह्या ठरल्या. कोरोना लसी संदर्भात दडपण होते, भीती होती, पण ती आता गेली आहे. जिल्ह्यातून पहिला क्रमांक लागल्याचा आनंद आहे. मात्र दडपण होते. पण देशासाठी पुढे आले. लवकरात लवकर ही लस सर्वसामान्यांना मिळावी अशी अपेक्षा नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर यांनी व्यक्त केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here