Home मराठी Maharashtra | सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी प्रतिनियुक्तीवर : देवेंद्र फडणवीस

Maharashtra | सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी प्रतिनियुक्तीवर : देवेंद्र फडणवीस

580

नागपूर ब्यूरो : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बदलीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजी प्रतिनियुक्तीवर गेले असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जयस्वाल पुन्हा एकदा केंद्राच्या सेवेत गेले आहेत. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून जयस्वाल केंद्रात गेल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

पोलीस महासंचालकांच्या प्रतिनियुक्तीवरुन हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की, “राज्याला एक कार्यक्षम पोलीस महासंचालक लाभले होते. मात्र गेले अनेक महिने राज्य सरकारचा जसा कारभार चालला, त्यांना विश्वासात न घेता पोलीस विभाग चालवले गेले, हे पहिल्यांदाच घडले, त्यालाच कंटाळून ते राज्य सोडून प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. पोलिसिंग हे स्वतंत्र विभाग आहे. पोलीस दल गृह विभागाच्या अखत्यारित येत असलं तरी आपण त्याला स्वायत्तता दिली आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं सुपरव्हिजनचं आहे. मात्र आता गृह विभागात छोट्या छोट्या बदलीसाठी हस्तक्षेप सुरु आहे. त्यामुळेच महासंचालकांनी प्रतिनियुक्तीवर जाणं पसंत केलं. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडत आहे. हे राज्याला भूषणावह नाही. पोलीस विभागात लोक येतात, जातात, मात्र नक्कीच पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल.”

नववर्षात महाराष्ट्राला नवीन पोलीस महासंचालक

सुबोध कुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नववर्षात नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत. त्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

शर्यतीत कोण?
  1. बिपिन बिहारी – 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, गृहनिर्माण विभागाचे प्रमुख आहेत
  2. हेमंत नगराळे – 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या त्यांच्याकडे कायदा विभागाची जबाबदारी आहे.
  3. संजय पांडे – 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते होमगार्ड विभागाचे प्रमुख आहेत
  4. रश्मी शुक्ला – 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी, नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत