Home हिंदी गोसेखुर्द प्रकल्प बाधित गावांचे पुनर्सर्वेक्षण आणि पुनर्वसन होणार

गोसेखुर्द प्रकल्प बाधित गावांचे पुनर्सर्वेक्षण आणि पुनर्वसन होणार

873

खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नाला यश, जिल्हाधिकारी करणार बाधित गावांचा दौरा

नागपूर ब्यूरो : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्सर्वेक्षण व पुनर्वसन होणार आहे. रामटेकचे शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वाटरमुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन करण्यासबंधी घेतलेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश दिले. यामुळे गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या यादीतून सुटलेल्या गावांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्याच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्वसनाबाबत एक बैठक घेण्यात आली. यावेळी, उमरेडचे आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अति. जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता देसाई, इतर वरिष्ठ अधिकारी, जिल्हा पुनर्वसन विभागातील अधिकारी यांच्यासह गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त व बॅक वाटरमुळे बाधित झालेल्या गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी यावर्षी 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुराने गोसेखुर्द प्रकल्पाविषयीचे नवे प्रश्न उपस्थित झाले असल्याचे मत लोकप्रतीनिधींनी मांडले.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्णत: भरला असून याच वर्षी कन्हान व वैनगंगा या नद्यांसह सहायक नद्यांना महापुर आला. गोसेखुर्द धरणाच्या बॅक वाटरमुळे कुही तालुक्यातील आवरमारा, कुजबा, चीचघाट, सावंगी या गावांसह रुयाड, राजोला नवेगाव यासह कुही व भिवापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. यामुळे काही गावे येत्या काळात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बाधित होण्याची शक्यता आहे. असे मत खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने म्हणाले, पूर बाधित गावांचा दौरा करीत असताना तेथील समस्या नागरिकांनी मांडल्या. अनेक गावांनी पुनर्वसन व्हावे यासाठी ग्राम पंचायतीमध्ये ठराव पारित केले आहेत. भविष्यात अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी आजच त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे, असे निर्देश देत 30 वर्षांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते असेही खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी, पुनर्वसन विभागाचे अधिकारी व गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सर्व गावांची पाहणी करावी व कुही तालुक्यात एक बैठक घेऊन पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी दिले.

गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे व धरणात पोहचणारे अनेक नदी-नाले बॅक वाटरमुळे भरून असल्याने अनेक गावे बाधित होत आहे. याशिवाय या गावात या बॅक वाटरमुळे अनके प्रकारचे आजार बळावले आहेत, असे मत स्थानिक लोकप्रतिनिधींनी नोंदविले. आमदार राजू पारवे यांनीही पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेना नेते व खासदार कृपाल तुमाने यांना केली.

यावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी खासदार कृपाल तुमाने व इतर लोकप्रतिनिधींच्या मागण्या मान्य केल्या व पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले. कुही तालुक्यातील पुनर्वसनाची समस्या सुटावी अशी इच्छा असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले व यासाठी लवकरच बाधित गावांचा दौरा करून तेथील समस्या सोडविल्या जातील असेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळू ठवकर, आवरमाराचे सरपंच कवडू वंजारी, हरदोलीचे सरपंच धनराज पडोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, कुही तालुका प्रमुख हरिश कडव, तालुका उपप्रमुख कवडू चाफले, युवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश भोयर, पांडुरंग बुराडे, प्रा. ओमदेव ठवकर, थोटे वकील, अभिजित वंजारी, राहुल थोटे, अतुल तिजारे, दिगंबर लामसे, ईश्वर लांबट, लालकृष्ण झन्झाळ, चंदू पडोळे याच्यासह नागरिक उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).