Home हिंदी कोव्हिड संवाद : कोव्हिड नंतरही घ्या आरोग्याची काळजी

कोव्हिड संवाद : कोव्हिड नंतरही घ्या आरोग्याची काळजी

647

नागपूरच्या डॉ.सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांचा सल्ला

नागपूर ब्यूरो : कोव्हिडपासून बचावासाठी सुरक्षा हाच उपाय आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार अत्यंत आवश्यक आहे. मात्र कोव्हिड पॉझिटिव्ह असतानाच्या काळासह कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरच्या काळातही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर आपण एकदम सुदृढ झालोत आपण कुठेही जाउ शकतो हा गैरसमज कुणीही बाळगू नका. कोव्हिड नंतर अनेकांना अनेक त्रास झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे कोव्हिड होउ नये यासाठी सुरक्षा बाळगा, कोव्हिड झाल्यास योग्य उपचार घ्या आणि कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला आयएमए च्या सहसचिव तथा मेयो च्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुषमा ठाकरे आणि कन्सल्टंट अ‍ॅनेस्थेसियोलॉजीस्ट अँड पेन फिजिशियन तथा मेयो च्या बधिरीकरण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.उमेश रामतानी यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता.6)  डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी  यांनी  ‘कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले  आणि  नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.


रुग्णालयात किंवा गृह विलगीकरणाचा 17 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोव्हिडची चाचणी करण्याची गरज नाही. हा काळ काळजी घेण्याचा आहे. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर अनेकांना महिनाभराने लक्षणे दिसून येतात तर अनेकांची लक्षणे तीन-तीन महिन्यांपर्यंत कायम असल्याचेही दिसून आले आहे. कोव्हिडनंतर येणा-या कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका त्यासाठी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहनही डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांनी केले.


कोव्हिड नंतर अनेकांना शारीरिक कमजोरी जाणवते, सांधे दुखी, मांसपेशींमध्ये दुखणे, काहींचे फफ्फुस बाधित झाल्याने श्वास घ्यायला त्रास होणे, रात्री झोप न येणे, झोपेतून उठून बसणे, नैराश्य, वैफल्याची भावना, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर आजारांचा शिरकाव, नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकाराचा झटका, असे अनेक त्रास कोव्हिडमधून बरे झालेल्यांना जाणवत आहेत. त्यामुळे यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, करता येईल तेवढे सौम्य व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, पाणी पिणे होत नसल्यास फळांचा रस, नारळपाणी आदींचे सेवन करा. कोव्हिडमध्ये आणि नंतर तेलकट, तिखट, चमचमीत, गोड, जास्त मिठ असलेले पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. आहारात अंडी खा, ताजी फळे खा., असा संदेशही यावेळी डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांनी दिला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).