Home Crime #Nagpur | नागपुरच्या पुस्तक कंपनीचालकाची नांदेड, भाईंदरमधील व्यापाऱ्यांकडून 1.05 कोटींनी फसवणूक

#Nagpur | नागपुरच्या पुस्तक कंपनीचालकाची नांदेड, भाईंदरमधील व्यापाऱ्यांकडून 1.05 कोटींनी फसवणूक

162
नागपूर ब्यूरो : नागपुरातील शैल्स इंटरनॅशनल कंपनीचालक पंकजसिंग जीत सिंग यांची नांदेड व भाईंदरमधील दोन व्यापारी प्रतिष्ठानांकडून तब्बल 1.05 कोटींची फसवणूक करण्यात आली. दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानांनी त्यांच्याकडून विक्रीसाठी पुस्तके मागवली व त्यांचे पैसेच दिले नाहीत. गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणात पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

थकीत 42.20 लाख रुपये दिलेच नाही
पंकजसिंग जीत सिंग (हजारीपहाड) असे तक्रार करणाऱ्या पुस्तक कंपनीचालकाचे नाव आहे. त्यांची शैल्स इंटरनॅशनल या नावाने पुस्तक कंपनी आहे. त्यांना जानेवारी महिन्यात नांदेड मधील भोकर तालुक्यातील नवा मोंढा येथील कोंडावार बुक हाऊसचे मालक गोविंद बालाजी कोंडावार, त्याची आई सुप्रिया व वडील बालाजी यांनी संपर्क केला. त्यांनी अगोदर 34.47 लाखांचा पुस्तकांचा ऑर्डर दिला. 90 दिवसांत पैसे देण्याचा करारदेखील करण्यात आला. मात्र कोंडावार कुटुंबाकडून पैसेच देण्यात आले नाही. त्यांनी लगेच पैसे देतो असे म्हणत 4 मे ते 26 जून या कालावधीत आणखी 7.86 लाखांची पुस्तके पंकजसिंग यांच्याकडून मागवून घेतली. मात्र थकीत 42.20 लाख रुपये दिलेच नाही. प्रत्येकवेळी त्यांनी टाळाटाळ केली. पंकजसिंग यांनी प्रत्यक्ष भेटून पैशांची मागणी केली असता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

63.24 लाख रुपये देण्यास टाळाटाळ

कोंडावार प्रमाणेच मीरा भाईंदर येथील रोशील एंटरप्रायझेसचचा मालक सुशील अंबिकाप्रसाद दुबे व त्याची पत्नी प्रियंवदा यांनीदेखील पंकजसिंग यांची फसवणूक केली. मार्च महिन्यात त्यांनी पंकजसिंग यांना संपर्क केला व एप्रिल ते जुलै या कालावधीत 68.14 लाखांची पुस्तके मागवली. प्रत्यक्षात त्यांनी 4.90 लाखच रुपये दिले. उर्वरित 63.24 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली व नंतर फोनच उचलणे बंद केले. कोंडावार व दुबे कुटुंबियांनी पंकजसिंग यांची एकूण 1.05 कोटींनी फसवणूक केली. अखेर पंकजसिंग यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.