Home मराठी Maharashtra | मी गुंगीत असताना काहींच्या हालचाली वाढत होत्या:उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर आरोप

Maharashtra | मी गुंगीत असताना काहींच्या हालचाली वाढत होत्या:उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर आरोप

भाजपने शब्द पाळला असता तर मविआचा जन्म झालाच नसता

”मी गुंगीत असताना माझे सरकार पाडले जात होते. तो फार वाईट अनुभव होता. मी बरा व्हावा म्हणून काहीजण देव पाण्यात ठेवून होते तर मी असाच राहावा म्हणून काहीजण वाईट चिंतीत होते ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणीत राहील. जेव्हा माझी हालचाल बंद होत होती तेव्हा काही जणांची हालचाल वाढत होती” असा आरोप शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रखर मते व्यक्त केली. त्यांची मुलाखत संपादक, शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी आजारपणातील काळातील धक्कादायक अनुभव कथन करीत सत्ता हिसकवण्याच्या कारस्थानावर भाष्य केले.

ठाकरे म्हणाले, माझ्या मानेची शस्त्रक्रिया झाली. अचानक पाच सहा दिवसानंतर सकाळी जाग आली, आळस देताना मानेची हालचाल बंद झाली. तो गोल्डन अवर होता त्यातच माझे ऑपरेशन झाले म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे.

ठाकरे म्हणाले, भाजपला शिवसेना संपवायची आहे. त्यामुळेच भाजपकडून कारस्थान रचले गेले. त्यांनी वेळीच शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले असते. आतापर्यंत अनेक वेळा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रत्येक वेळी शिवसेना जोमाने उभी राहिली आहे.

ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करतो आणि त्यांच्याकडून राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर केला जातो. मुख्यमंत्री म्हणून माझा एकही निर्णय हिंदूला विरोध करणारा असल्याचे दाखवून द्या. अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभारत आहोत. गड किल्ले असतील, मंदिरांसाठी भरघोस निधी असेल, असे अनेक निर्णय आपण घेतले आहेत. अनेक निर्णय आपण हिंदू म्हणून घेतले आहेत.

ठाकरे म्हणाले, शिवसेना तळपती तलवार आहे. ती जर मॅनात ठेवली तर तीला गंज चढतो. त्यामुळे ती तर तळपलीच पाहिजे. मात्र, त्यासाठी तलवारीने वार करा, असे मी म्हणणार नाही. पूर्वी मराठी माणसासांठी, कामगारांसाठी शिवसेना लढली. नंतर भूमीपुत्रांसाठी लढली. ‘अन्याय तिथे वार’ हेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे.

ठाकरे म्हणाले, हा पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत. ठाणेकर सुज्ञ आहेत. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे यांचे नाते आहे. ठाणेच नाही तर मुंबई आणि आजूबाजूचा सर्व परिसर यांचे आणि शिवसेनेचे नाते वेगळे आहे.

ठाकरे म्हणाले, आता निवडणूक घ्या, जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून चूक केली असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल. नाही तर त्यांची चूक असेल तर लोक त्यांनातरी घरी बसवतील. किंवा आम्ही पाप केले म्हणून आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या निवडणुका, माझी तयारी आहे.

ठाकरे म्हणाले, आता दोन तृतीयांश बहुमत असून देखील त्यांना गट स्थापन करता येत नाही. या संदर्भात मी कायदेतज्ज्ञांशी बोललो आहे. त्यामुळे त्यांना एकतर भाजपमध्ये तरी जावे लागेल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मोठ्या पक्षात तरी जावे लागेल. हे बंडखोर आमदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना यांचा काही उपयोग नाही. भाजपला त्यांचा जो उपयोग करून घ्यायचा आहे. तो करता येणार नाही. म्हणून त्यांच्याकडून आम्ही म्हणजेच शिवसेना असा भ्रम निर्माण केला जातोय.

ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते नेहमी माझ्या बाजूला असायचे. काही प्रश्नांची उत्तरे मी द्यायचो तर काही प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री अजित पवार द्यायचे. मात्र आम्ही कधीच एकमेकांचा माईक खेचला नाही. ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचे नाव भाजप आणि शिंदे गट घेत आहेत. त्यांचे नाव पुढे करुन ते समाजात सम्रंभ करीत आहेत. मला देशाच्या घटनेवर विश्वास आहे. चोरी मारी सर्वत्र चालते पण मी सत्यमेव जयते मानतो. आज सत्ता मेव जयते हा शिंदे आणि भाजपचे ब्रीद आहेत.

ठाकरे म्हणाले, ज्यांना मी अधिकार दिले होते. त्या शिंदे यांनीच धोका दिला. माझ्याकडे साधी खाती ठेवली होती. शिंदेंकडे नगरविकास खाते होते, आयटी मी माझ्याकडे ठेवले होते, कारण आयटी तंत्रज्ञानामुळे समाजाचा कसा फायदा होईल याचा मी विचार केला आणि नवीनतम गोष्टी आणण्यासाठी मी ते ठेवले होते. ठाकरे म्हणाले, चुक माझी आहे. गुन्हा माझा आहे की मी शिंदे यांना परिवारातील समजलो. समजा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले असते तर त्यांनी वेगळे काय केले असते त्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांना अजून काय हवे आहे. ते स्वतःला बाळासाहेब मानत आहेत.

ठाकरे म्हणाले, मविआचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता पण तसे झाले नाही. सत्ता येताच आम्ही जनतेची कामे केली, निर्णय घेतले. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांत माझे नाव घेतले जात आहे ते जनतेमुळेच घेतले जात आहे. कोरोनाकाळात परिस्थिती तशी होती आणि लोक ऐकत होते. मी बाहेर पडलो असतो तर लोकांना सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे झाले असते.