Home मराठी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन महिनाभर पुढे ढकलले, तज्ज्ञ समितीचा दौरा न झाल्याचे कारण

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन महिनाभर पुढे ढकलले, तज्ज्ञ समितीचा दौरा न झाल्याचे कारण

येत्या २ मे रोजी होणारे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन महिनाभर पुढे ढकलण्यात आले आहे. महामार्गातील वन्यप्राणी ओव्हरपासचे काम अपूर्ण राहिल्याने ते पुढे ढकलण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी कळवले. मात्र, या महामार्गात येणारे ओव्हरपास, अंडरपास तसेच छोट्या पुलांच्या कामात सुधारणा सुचवणाऱ्या तज्ज्ञ समितीचा दौरा न झाल्यामुळे उद्घाटन पुढे ढकलल्याचे कारण समोर येत आहे.

वन्यप्राणी ओव्हरपासचे काम अंतिम टप्प्यात असताना १०५ पैकी काही आर्च स्ट्रिपला हानी पोहोचल्याने नवीन सुपर स्ट्रक्चर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उद्घाटन केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा केलेल्या पाहणी दौऱ्यात हानी पोहोचल्याचे लक्षात का आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या महामार्गात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जेथे येतात, अशा जलसाठ्यांच्या ठिकाणी बरेचसे छोटे पूल म्हणजेच बाॅक्स कन्व्हर्ट आहेत. त्यातही तज्ज्ञ समितीने सुधारणा सुचवल्या होत्या. मात्र मंत्र्यांनी दौरा करताना समितीला सोबत घेतले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वन्यजीवप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे सीएमओ कार्यालयाने कानपिचक्या दिल्यानंतर अचानक ओव्हरपासचे कारण पुढे आल्याचे समजते.

समृद्धी महामार्गावर तज्ज्ञ समितीद्वारे सुचवण्यात आलेल्या वन्यजीव उपशमन योजनांची पूर्तता झाली की नाही, याबाबतचा प्रगती अहवाल अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समितीला मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करेल.
– किशोर रिठे, सदस्य, तज्ज्ञ समिती, समृद्धी महामार्ग, वन्यजीव उपशमन योजना

Previous articleपाच वर्षांत 2.1 कोटी नोकऱ्यांमध्ये घट; 45 कोटींची रोजगाराच्या संधीकडेच पाठ, महिलांची स्थिती वाईट
Next articleचातगाव येथे मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबीर, विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 1 मे ला होणार उद्घाटन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).