मोटारसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलांनाही हेल्मेट वापरणे रस्ते परिवहन मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. मंत्रालयानुसार, 4 वर्षांखालील मूल दुचाकीवर बसलेले असेल तर त्याला क्रॅश हेल्मेट घालणे तसेच गाडीला सेफ्टी हार्नेस लावणे बंधनकारक असेल. मंत्रालयाच्या नव्या नोटिफिकेशननुसार, पाठीमागे 4 वर्षांखालील मूल बसलेले असेल तर मोटारसायकल ताशी 40 किमी पेक्षा जास्त वेगाने चालवता येणार नाही. हे नोटिफिकेशन 15 फेब्रुवारी 2022 ला निघाले आहे. त्याच्या एका वर्षानंतर हे नियम अमलात येतील. मुलांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.
हे आहेत मोटार वाहन कायद्याचे नवीन नियम
मोटार वाहन कायदा, 1988 (1988A 59) च्या कलम 137 च्या खंड (कक) च्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकारने केंद्रीय मोटर कायदा नियम, 1989 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालील नियम केले आहेत. केंद्रीय मोटर वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 हे नवीन नियमांचे संक्षिप्त रूप आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील, नियम 138 च्या उप-नियम (6) नंतर, खालील उप-नियम समाविष्ट केले जातील. केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, मोटारसायकल चालकाने 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलाला सीटच्या मागे घेऊन जाताना सुरक्षा हार्नेस वापरावा.
सेफ्टी हार्नेस: सेफ्टी हार्नेस हे अॅडजस्टेबल जॅकेटसारखे असते. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीसोबत ते मुलांना बांधून ठेवत असते. यामुळे अचानक झटका बसला तरी मूल खाली पडत नाही. सेफ्टी हार्नेस हा मुलाने घातलेला अॅडजस्टेबल बेल्ट आहे. हा बेल्ट लहान मुलांना शाळेतील बॅगप्रमाणे घातला येतो.
क्रॅश हेल्मेट : हे नुसते टोपीसारखे घातले जाणारे हेल्मेट नव्हे. क्रॅश हेल्मेटमध्ये मुलाचे डोके पूर्णपणे कव्हर झालेले असते. यामुळे मूल खाली पडले तरी डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका कमी असतो. नव्या नियमांनुसार वाहन चालवताना क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे. सरकारने हेल्मेटसंबधी दिलेल्या सुचनांचे पालन देखील करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने हेल्मेट कंपन्याना यापूर्वीच क्रॅश हेल्मेट तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नवीन वाहतुक नियमांनुसार या नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आणि तीन महिन्याचा ड्राइविंग लायसेंस निलंबित केला जाऊ शकतो. दुचाकींवर मागे बसणाऱ्या मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात एक नवीन नियम समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
वाहतुकीचा नवीन नियम दुचाकीस्वारांसाठी हे सुनिश्चित करतो की, लहान मुलांसोबत प्रवास करताना वाहनाचा वेग ताशी 40 किलोमीटर पेक्षा जास्त नसावा. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी करून नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये वाहनचालकांना सेफ्टी हार्नेस आणि क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता. हा नियम 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे.