मुंबई ब्युरो : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून उल्लेख केलेली अमोल काळे ही व्यक्ती अखेर समोर आली आहे. अमोल काळे यांनी गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू मांडली. यावेळी अमोल काळे यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे का होईना पण कठोर शब्दात इशारा दिला आहे.
अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्षही आहे. माझ्यासंदर्भात काही नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. माझ्या उत्पन्नाचा तपशील आयकर खात्याला सादर करण्यात आलेल्या विवरणपत्रात आहे. मी महाराष्ट्र सरकारचे कोणतेही कंत्राट घेतले नव्हते. तरीही काही नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी हेतुपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही. अशा लोकांविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरु करत आहे, असे अमोल काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर संजय राऊत आणि शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.