Home Maharashtra 68 दिवसांनंतर एसटीचा संप अखेर मागे, शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी

68 दिवसांनंतर एसटीचा संप अखेर मागे, शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी

362

गेल्या ६८ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचारी-कामगारांचा संप मागे घेण्याची घोषणा २२ संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर सोमवारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत संघटनांच्या प्रतिनिधींची दीर्घकाळ बैठक झाली. पवारांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे एसटी संपाची कोंडी फुटली. तसेच उच्च न्यायालयात शासनात विलीनीकरणाची मागणी लावून धरणारे अॅड.गुणरत्ने सदावर्ते यांचे वकीलपत्र मागे घेतले असून त्यांच्या जागी अॅड. सतीश पेंडसे यांची नियुक्ती केल्याचीही घोषणा कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था मुंबईच्या गिरणी कामगारांसारखी करायची नाही. आम्ही भानावर आलो आहोत,’ अशा शब्दांत संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

एसटी कामगार-कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, परिवहनमंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी बैठक पार पडली. तीत तोडगा काढण्यात आला. संप मागे घेण्यावर सर्व २२ संघटनांचे एकमत झाले. एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे.

विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा न्यायप्रविष्ट असून त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी स्पष्ट केले. तर बडतर्फ, निलंबित आणि सेवा समाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वाहतूक सुरळीत झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे मंत्री ॲड.परब यांनी सांगितले.

निलंबन, बडतर्फ आणि सेवा समाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रुजू झाल्यास ही नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही प्रमादीय कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले. तसेच याबाबतचे परिपत्रक काढण्याचे निर्देशही अॅड.परब यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने ४ नोव्हेंबरला संपाची नोटीस दिली होती. सरकार व संपकरी यांच्यात २८ बैठका. २८ टक्के महागाई भत्ता जाहीर. ४१ टक्के पगारवाढ दिली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एसटी विलीनीकरणासाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त. संपकाळात एसटी महामंडळाचे ६०० कोटींचे नुकसान. ३ हजार कंत्राटी चालकांच्या नियुक्तीला प्रारंभ. निलंबित कर्मचारी ११ हजार २४. बडतर्फ कर्मचारी १ हजार ९२६. कारणे दाखवा नोटीस बजावलेले कर्मचारी ३ हजार ६७९. कामावर हजर कर्मचारी २४ हजार ३३९. चालू आगारे १८०. बंद आगारे १७०.

“ज्या संघटनांनी माझे वकीलपत्र काढले त्या संघटना बेकायदा आहेत. मी ९२ हजार कष्टकरी कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे,’ असे प्रत्युत्तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे.

आम्ही पुकारलेला संप २० डिसेंबर रोजी मागे घेतलेला होता. पण काही अडचणी होत्या, त्या आज सोडवण्यात आल्या आहेत. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कसे वेतन देता येईल यासंदर्भात चर्चा झाली आहे. एसटी विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूंच्या लोकांना मान्य असेल, असे स्पष्ट करत “सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे,’ असे आवाहन कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी केले.

आमचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संप भरकटवला. त्यांनी एसटीचे विलीनीकरण एके विलीनीकरण हा मुद्दा लावून धरला. त्यांचा हेतू वेगळा होता. आता आम्ही भानावर आलो आहोत, असे मुंबईत संघटनांचे प्रतिनिधी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तर औरंगाबाद आणि नाशिक आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीतील निर्णयाचे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी स्वागत केले आहे. आतापर्यंत कोणतीही कारवाई न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी लगेच कामावर परत येण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. कामावर परत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र एसटी कामगार सेना भक्कमपणे राहणार आहे. कामगार सेनेचे राज्यात २८ हजार सदस्य आहेत. सर्व कामगार मंगळवारपासून कर्मचारी रुजू होतील, अशी ग्वाही मालोकार यांनी दिली.

Previous articleसुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधिश करतील तपास, NIA आणि IB च्या अधिकाऱ्यांचा असेल समावेश
Next articleसंसर्गवाढीचा धोका, सोमवारी देशात 1 लाख 65,873 नवे रुग्ण आढळले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).