Home Covid-19 #Omicron । ओमायक्रॉन कमी घातक, प्रवासबंदीही हटवू शकते अमेरिका

#Omicron । ओमायक्रॉन कमी घातक, प्रवासबंदीही हटवू शकते अमेरिका

282
0

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत असतानाच एक चांगली बातमी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांच्या मते, ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट दुसऱ्या लाटेत हाहाकार निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक आहे. सुरुवातीचे वैज्ञानिक अभ्यास हेच सांगत आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन वेगाने पसरला, पण तेथे संक्रमित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज खूपच कमी पडली. फाउची म्हणाले की, बायडेन प्रशासन आफ्रिकी देशांवर लावलेली प्रवासबंदी लवकर हटवण्याबाबत विचार करत आहे. संसर्गाची स्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण आढळले आहेत. तरीही गहलोत सरकार ते गंभीर मानत नाही. सोमवारी राजस्थान सरकारने हायकोर्टात म्हटले की, ओमायक्रॉन जास्त घातक नाही. १२ डिसेंबरला महागाईविरोधात होणाऱ्या काँग्रेसच्या सभेला आव्हान देणारी याचिका के‌वळ पब्लिसिटी स्टंट आहे, त्यामुळे ती याचिका फेटाळावी. नंतर कोर्टाने राज्य सरकारचा युक्तिवाद मान्य करत याचिका फेटाळली.

ओमायक्रॉन हवेतून एका खोलीतून दुसरीत फैलू शकतो. ‘इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज’मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार हाँगकाँगच्या एका हॉटेलमध्ये लस घेतलेले दोन प्रवासी समोरासमोरच्या खोलीत थांबले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार दोघेही खोलीतून बाहेर पडले नाहीत, तरीही एक प्रवासी १३ ला, दुसरा १७ नोव्हेंबरला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला. जेवण घेण्यासाठी दार उघडले तेव्हा ते संक्रमित झाले असावेत, अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात सोमवारी ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळल्यानंतर देशात रुग्णांचा आकडा २३ झाला आहे. त्यापैकी १० महाराष्ट्राचे आहेत. नवे दोन्ही रुग्ण मुंबईचे आहेत. दोघांनी फायझर लस घेतली आहे. कर्नाटकच्या चिकमंगळूर येथे शाळेत संक्रमितांचा आकडा वाढून १०१ झाला आहे. त्यात ९० मुले तर ११ कर्मचारी आहेत.

बूस्टर डोसबाबत निर्णय नाही : केंद्र सरकार बूस्टर डोसबाबत निर्णय घेऊ शकले नाही. सोमवारी झालेल्या लसीकरणावरील राष्ट्रीय गटाच्या बैठकीत गंभीर रुग्णांना तिसरा अतिरिक्त डोस देण्याबाबत फक्त चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here