एलकेम कंपनी आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार साकार
नागपूर ब्युरो : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी त्यात संगणकाची उपलब्धता ही बाब अडसर ठरत होती. मनपाच्या शाळेत येणा-या गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. एलकेम कंपनीद्वारे सी.एस.आर. निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेला एक बस देण्यात आली असून त्यामध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या बसचे गुरूवारी (ता.२) मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, एलकेम कंपनीचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन आणि मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
मकरधोकडा येथील मनपाच्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेमध्ये उद्घाटन समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, एम.आय.ए.चे अध्यक्ष चंद्रशेखर शेवगावकर, एलकेमच्या नागपूर प्लांट हेड दुष्यंत पाठक, सह्याद्रीचे अध्यक्ष विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत प्रस्तुत केले.
एलकेम कंपनीद्वारे सह्याद्री फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अत्याधुनिक बसमध्ये १८ सिट्स असून यामध्ये लॅपटॉप प्रोजेक्टर, एसी, प्रथमोपचार पेटीची व्यवस्था आहे. यावर इयत्ता पाचवी ते नववीच्या अंदाजे ८००० विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण तसेच अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त होणार आहे. संगणक शिक्षणामुळे मनपाच्या विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक कल्पना, आविष्कार यासंदर्भात त्यांच्या पंखांना बळ मिळेल.
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे मुख्यत: गरीब आणि गरजू असल्याने त्यांना संगणक शिक्षण घेणे अनेक कारणांमुळे अवघड जाते. आधुनिक शिक्षणामध्ये निर्माण होणारी ही उणीव पूर्ण करण्यात एलकेम कंपनीच्या पुढाकाराने मिळालेली संगणक बस महत्वाची भूमिका निभावणार आहे.
या व्यवस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाद्वारे नव्या विश्वाकडे जाण्यास मदत होईल आणि स्पर्धेमध्ये ते आपले अस्तित्व सिद्ध करून यशाचे शिखर गाठू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करता आले. या संगणक शिक्षण बसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत होईल व त्यांना त्यात आवड निर्माण होईल. यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या सुद्धा वाढेल आणि शाळा सोडणा-या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण होउन ते पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येतील, असेही ते म्हणाले.
एलकेम संस्थेचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन यांनी आपल्या भाषणात एलकेमच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी आश्वस्त केले की, मनपाच्या गरीब आणि होतकरू मुलांना कम्प्यूटरचे शिक्षण देण्यासाठी आणखी बस देण्यात येतील. कंपनीतर्फे अशा प्रकारचे प्रकल्प मुंबईमध्ये सुद्धा रविबविण्यात येत आहेत,असेही त्यांनी सांगितले.
कंपनीचे दुष्यंत पाठक यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा उद्देश शाळकरी मुलांना संगणक शिक्षणाकडे वळविणे हा आहे. ही बस विविध शाळांमध्ये फिरणार असून त्यांना संगणक शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शाळा सोडणा-या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन संध्या शर्मा यांनी केले. आभार दीपक क्षीरसागर यांनी मानले. यावेळी एलकेम कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी ईशा भाटिया, सीनियर मॅनेजर संजय बेडेकर, एच.आर. मॅनेजर पराग गोखले, शाळेच्या मुख्याध्यपिका पुष्पा डॅनियल, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.