मुंबई ब्युरो : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यांनी कवडीमोल भावात अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मुंबईत 3 एकर जमीन घेतली. त्याचे पुरावे आपण योग्य त्या तपास संस्थेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबई बॉम्बस्फोटात ज्या माणसाला जन्मठेप झालेली आहे त्या सरदार शाह वली खान आणि हसीना पार्करचा फ्रंटमॅन सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी संबंध आहेत. या दोघांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली कंपनी सॉलिडस कंपनीला मुंबईत 3 एकर जमीन कवडीमोल भावात दिली.
मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या एलबीएस रोडच्या मागे 3 एकर जागा आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा गोवावाला कुटुंबियांच्या नावे होती. त्याची पावर ऑफ अटर्नी सलीम पटेल याने घेतली होती. त्याच सलीम पटेलसह सरदार शाह वली खान हा पावर ऑफ अटर्नी मिळविणारा दुसरा व्यक्ती होता. त्या दोघांनी मिळून 3 एकराची जागा नवाब मलिक यांच्या कुटुंबाची कंपनी सॉलिडसला अवघ्या 30 लाख रुपयांत विकली.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/VvpeZTlHNw
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 9, 2021
फडणवीस पुढे म्हणाले, मिळालेल्या कागदपत्रानुसार, त्यांनी यातील केवळ 20 लाख रुपयांचे पेमेंट केले. मार्केट रेटनुसार, 2005 मध्ये त्या ठिकाणी असलेल्या जमीनीचे दर किमान 2050 रुपये प्रति चौरस फूट होती. मात्र, नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीने ही जमीन अवघ्या 15 रुपये चौरस फुटांत घेतली. मुंबईत उकीरड्यावरील जागा सुद्धा इतक्या स्वस्तात भेटत नाही. मग ही जमीन इतक्या स्वस्तात कशी दिली? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सध्या या जमीनीवर एक शेड भाड्याने दिला आहे. त्या शेडलाच किमान 1 कोटी रुपये महिना असा भाडा मिळतो असेही ते पुढे म्हणाले.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉलिडस ही कंपनी त्यावेळी फराज मलिक (नवाब मलिकांचे पुत्र) यांच्या नावे होती. कागदपत्रांवर त्यांचीच स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे, काही वेळ या कंपनीचे संचालक नवाब मलिक सुद्धा होते. तसेच त्यांच्या बंधूंनी सुद्धा या कंपनीची जबाबदारी सांभाळली. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, की त्यांच्याकडे या व्यवहारांची रेजिस्ट्री आहे. यासोबतच “इतर 5 जमीनींचे व्यवहार त्यांची माहिती माझ्याकडे आहे. ही संपूर्ण माहिती मी योग्य त्या तपास संस्थेला सुपूर्द करणार आहे. ही कागदपत्रे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील देणार आहे. जेणेकरून राष्ट्रवादीचे मंत्री काय करतात हे त्यांनाही कळायला हवे.”
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे, “सरदार शाह वली खान हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. तसेच त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. टायगर मेमनच्या कटात तो सहभागी होता. टायगर मेमनच्या घराखाली ज्या गाड्यांमध्ये स्फोटके भरण्यात आली. ती भरताना तो त्या ठिकाणी होता. त्यानेच बॉम्बस्फोट घडवण्यापूर्वी ठिकाणांची रेकी केली होती. तो मुंबईचा हत्यारा आहे.”
तर सलीम पटेल उर्फ मोहम्मद इर्शाद पटेल हा दाउदची बहीण हसीना पार्करचा फ्रंटमॅन होता. भारताचा शत्रू नंबर एक दाउद इब्राहीम जेव्हा मुंबई सोडून परदेशात पळाला. तेव्हा त्याच्या मुंबईतील लँड माफिया बिझनेसची सूत्रधार त्याची बहीण हसीना पार्कर होती. त्याच हसीना पार्करचा सलीम पटेल ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि फ्रंटमॅन होता. 2013-14 साली दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीतला एक फोटो व्हायरल झाला होता. तो आर आर पाटील आणि एका अंडरवर्ल्ड सदस्याचा होता. तोच अंडवर्ल्डचा सदस्य सलीम पटेल होता. आर आर पाटील यांचा त्यात काहीही दोष नव्हता. तरीही फोटो व्हायरल झाल्याने त्यांना ट्रोल करण्यात आले होते असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले, की टाडा कायद्यांतर्गत गुन्हेगार किंवा आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारला आहे. 2007 मध्ये टाडा प्रकरणी शाह वली खानचे कन्विक्शन झाले. त्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वीच या जमीनीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे, टाडा अंतर्गत जमीन जप्त होऊ नये म्हणून जमीनीचे व्यवहार करण्यात आले का? असा थेट सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे.
#Maharashtra । एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, महामंडळ अवमान याचिका दाखल करणार- अनिल परब