Home Bandh Maharashtra Bandh । प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी “महाराष्ट्र बंद”मध्ये सामील व्हा...

Maharashtra Bandh । प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी “महाराष्ट्र बंद”मध्ये सामील व्हा : सामनातून आवाहन

545
मुंबई ब्युरो : सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे.

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले. या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना.

मंत्रिपुत्राने गाडी खालून ठार मारलं

लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजप खासदारांच्या दारात उभे राहिले. शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले. तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.

मोदी, शहा आणि कृषीमंत्र्यांनी साधी संवेदनाही व्यक्त केली नाही

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रिपुत्रास अटक केलीच नाही. प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा शेतकऱ्यांचे खून करणाऱ्या मंत्रिपुत्रास सन्मानाने बोलावून अटक केली. अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी. शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत. कृषिमंत्र्यांनी तरी तत्काळ लखीमपूर खेरीत पोहोचायला हवे होते. ते गेले नाहीच. उलट तेथे जाणाऱ्यांना रोखून ठेवले.

भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. तेव्हा वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली. लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे. तसे असेल तर ते गंभीर आहे. हिंदू आणि शीख एकच आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न देशाला आता परवडणारा नाही.

तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल!

वरुण गांधी हे सुद्धा इंदिरा गांधींचे नातू व संजय गांधींचे पुत्र आहेत. लखीमपूर खेरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त तापले व त्यांनी मत व्यक्त केले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे काय? शेतकऱ्यांच्या हत्या, त्यांच्या रक्ताचे पाट पाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल. वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही.

अशा सगळ्यांसाठी आजचा महाराष्ट्र बंद

त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे.


11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद यशस्वी करा : महाविकास आघाडी

सोमवारला आयोजित करण्यात आलेल्या या बंद ला यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतः आपापली दुकाने बंद करावी असे आवाहन महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील नेते, पदाधिकारी यांच्यासमवेत महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आमदार दुष्यंत चतुर्वेदी,संपर्क प्रमुख शिवसेना नागपुर, आमदार विकास ठाकरे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपुर शहर, प्रमोद मानमोडे महानगर प्रमुख शिवसेना नागपुर,धुनेश्वर पेठे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर शहर तर्फे करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी नागपुरातील नागरिक, व्यापारी, कर्मचारी आणि वाहतूकदारांना आवाहन केले आहे की, देशाच्या अन्नदात्याच्या सन्मानार्थ, त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळवण्यासाठी बंद यशस्वी करावे. शहरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिका तर्फे घोषित महाराष्ट्र बंद ला सफल करण्यासाठी सकाळी 10 वाजता वेरायटी चौक, बर्डी येथे एकत्रित होवून महाविकास आघाड़ी चे कार्यकर्ता नागपुर बंद यशस्वी करतील अशी माहिती नितिन तिवारी शिवसेना शहर प्रमुख नागपुर, आम.वझाहत मिर्झा,काँग्रेस, क्रांती (बाळासाहेब) कामारकर, राष्ट्रवादी, पराग पिंगळे,शिवसेना, राजेंद्र गायकवाड, शिवसेना, विश्वास नांदेकर,शिवसेना, नितीन मिर्झापुरे, प्रहार जनशक्ती, विपीन चौधरी, प्रहार जनशक्ती, सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा प्रमुख शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, जनशक्ती पार्टी यांनी दिली आहे.

“महाराष्ट्र बंद” साठी व्यापाऱ्यांना जबरदस्ती करू नये : अश्विन प्रकाश मेहाडिया

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर ला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अश्विन प्रकाश मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांनी 11 तारखेच्या बंद दरम्यान व्यापारी लोकांना जबरदस्ती न करण्याची विनंती केली आहे.

त्यांनी रविवार, 10 ऑक्टोबर रोजी एक वीडियो संदेश जारी करुन ही मागणी केली आहे. ते म्हणाले की आम्ही सुद्धा लखीमपूर येथील घटनेचा विरोध करीत आहोत. आम्हाला सुद्धा वाटते की या प्रकरणात दोषी लोकांना शिक्षा दिली जावी, मात्र सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व्यापारी महाराष्ट्र बंद दरम्यान आपली दुकाने बंद करण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही. जर अश्या प्रसंगी व्यापारी बंद ला समर्थन करीत आपली दुकाने बंद करेल तर ग्राहक ऑनलाइन खरेदी कड़े वळण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे जे व्यापारी स्वतः दुकान बंद करतील त्यांचे स्वागत आहे. मात्र ज्यांना बंद करायचे नाही त्यांना जबरदस्ती केली जाऊ नये.

Previous articleMiss & Mrs Vidarbha | ऑडिशन राउंड में रैंप पर बिखेरा खूबसूरती का जलवा
Next articlePetrol – Diesel Price | लगातार सातवें दिन बढ़े तेल के दाम, मुंबई में डीजल का भाव 101 रुपये के पार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).