मुंबई ब्युरो : महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्य हादरुन गेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. स्वत:च्या घरात काय चाललं आहे ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे असतं? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे.
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत ही दुख:द बाब आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यावर साम, दाम, दंड , भेद अशा कुठल्याही प्रकारे तडा आणता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे? असा सवाल अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
शक्ती कायद्यासाठी 2 दिवसांचं विशेष अधिवेशन गरजेचं
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा असं सुचवलं होतं. महाराष्ट्र एक कुटुंब आहे. कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्यानं घरातील कर्त्या व्यक्तीला पत्र पाठवलं तर तो कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय हे सांगतात. तुम्ही अन्य दहा कुटुंबाबाबत का बोलता? असा सवाल करतानाच शक्ती कायद्यासाठी 2 दिवसांचं विशेष अधिवेशन गरजेचं असल्याचं मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
‘टक्केवारी दाखवू नका, महिलांवर अत्याचार रोखा’
राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या रोज पुढे येत आहे. साकीनाका, डोंबिवलीतील महिला अत्याचाराच्या बातम्या पुढे आल्या. तुम्ही टक्केवारी दाखवू नका. 2 महिने लक्ष कुठे आहे? आपल्या माणसांना वसुली मिळतेय त्यावर लक्ष आहे का? असा घणाघात अमृता फडणवीसांनी केलाय. तसंच तुम्ही हे प्रकार घडण्यापासून रोखले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून बलात्कार
मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात. एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.