Home Maharashtra Ganesh Chaturthi | गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi | गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

मुंबई ब्युरो : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या लाडक्या गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील.

आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलीस बंदोबस्त दिसला नाही किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील दिसले नाही.

आजपासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशावेळी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. पहाटे पाच पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाहीये. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करत नाही.

पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना दुपारपर्यंत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळांनी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना आज दुपारपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे.

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलाय. कोकणात सध्या वातावरण बाप्पामय झालंय. परंपरा आणि संस्कृतीसाठी कोकणातला गणेशोत्सव ओळखला जातो. त्यामुळेच त्याचे वेगळेपण पहायला मिळते. कोकणात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणपती आणण्याची प्रथा आहे. मात्र घरी गणपती वाजत गाजत नेताना ज्या ठिकाणी सुबक आणि रेखिव गणेशमुर्ती बनवण्यास सांगण्यात आलेल्या असतात अशा गणेशचित्र शाळेत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत चाकरमानी येतात. गणेशचित्रशाळेतून गणपती घरी नेण्याची वेगळी परंपरा कोकणात पहायला मिळते. बाप्पाला घरी नेताना गणेशमुर्तीशाळेत पानाचा विडा सुपारी आणि दक्षिणा ठेवून गणपती बाप्पाचा जयघोष करुन आपल्या लाडका गणपती घरी घेवून जाण्यास सज्जा होतो.मात्र त्यात वेळी बाप्पाला गऱ्हाणे घालून कोकणात गणपती उत्सवाला सुरवात होते.

मुंबईत कलम 144 लागू

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमावबंदी असणार आहे. गणपतीच्या आगमनाला फक्त काही तास शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here