नागपूर ब्युरो : नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर घातली. आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचं न ऐकता दुकानं उघडू, प्रसंगी असहकार आंदोलन छेडू, असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी फडणवीसांना भेटल्यावर व्यक्त केला.
नागपूर जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ही रेट कमी असतानाही, निर्बंध शिथिल झाले नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील व्यापारी संतप्त आहे. व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर व्यापाऱ्यांच्या सर्व व्यथा मांडल्या.
… तर बुधवारपासून करणार असहकार आंदोलन
शिवाय आज सरकारने निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर नागपुरातील व्यापारी बुधवारपासून असहकार आंदोलनाच्या तयारीत आहेत. निर्बंध शिथील न झाल्यास सरकारचे निमय न पाळता उशीरापर्यंत दुकान सुरु ठेवणार, असा इशारा सुद्धा आता व्यापाऱ्यांनी दिलाय.
आठवड्याभरापूर्वी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सततच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यात लिहिलं होतं.
जगणं कठीण झालंय, शिथीलता देण्याची खरी गरज
सातत्याच्या निर्बंधांमुळे नागपुरातील व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायिक यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी 4 नंतर सुरू होतो. पण, 4 वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी फडणवीसांनी या पत्राच्या माध्यमातून राज्याच्या मुख्ममंत्र्यांकडे केली होती.