Home मराठी Viral Video । नागपुरात राडा ! आरएसएस मुख्यालय, काँग्रेसची रॅली, भाजप कार्यकर्ते...

Viral Video । नागपुरात राडा ! आरएसएस मुख्यालय, काँग्रेसची रॅली, भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

नागपूर ब्युरो : संघ मुख्यालयाजवळ आज (1 ऑगस्ट) दुपारी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. “संघ मुख्यालय से संसद तक” या आशयाची एक रॅली युवक काँग्रेसच्या नागपुरातील काही कार्यकर्त्यांनी काढली होती. महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा निषेध करत नागपुरातून दिल्लीपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात ही रॅली आज नागपुरातून दिल्लीला रवाना होणार होती. त्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज महाल परिसरातील संघ मुख्यालयाजवळ पोहोचले.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते झाले समोरासमोर

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संघ मुख्यालय जवळील गल्लीतून जाण्याचा विचार होता. मात्र, ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना कळताच ते देखील संघ मुख्यालयाजवळ गोळा झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्यानंतर शाब्दिक वादाला सुरुवात झाली. काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके आणि त्यांचे सहकारी संघ मुख्यालयाजवळून रॅली नेण्यावर ठाम होते. तर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

अखेर पोलिसांनी केली मध्यस्ती

संघ मुख्यालय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण असल्याने त्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था लावलेली असते. संघ मुख्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने कार्यकर्ते नियंत्रणात येत नव्हते. पोलिसांची संख्या वाढल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मागे हटविण्यात आलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निघून गेले. पण त्याठिकाणी काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here