Home Maharashtra Maharashtra । राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

Maharashtra । राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

सोलापूर ब्युरो : तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारला दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण शुक्रवारी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं”, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.

‘विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय’

गणपतराव यांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेले चार दिवस मी सोलापुरातच होतो. आज सकाळी आलो. त्यांची तब्येत सुधारत होतो. पण आता घरी पोहोचल्यावर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला फोन केला. मी पुन्हा सांगोल्याकडे निघालो आहे. आबासाहेब यांच्या निधनाने विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आबासाहेब म्हणजे विधीमंडळातलं विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ही ऐकताना आम्हाला एकदम भारावून जायचं. गणपतराव यांनी आम्हाला घडवलं. ग्रामीण भागात काम करताना कष्टकरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करुन त्यांच्यासोबत कसं काम करावं ही शिकवण आबासाहेबांनी आम्हाला दिली. म्हणून त्यांची पोकळी आमच्यासाठी कधीही भरुन न निघणारी आहे. मला आता बोलायला सुद्धा शब्द कमी पडत आहेत. गेले तीन दिवस मी त्यांच्याजवळ रुग्णालयातच होतो”, असं जयंत पाटील म्हणाले.

11 वेळा आमदार म्हणून निवडून आले

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

केवळ दोनदा पराभव

शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे. तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला. या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र, प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.

तर मुख्यमंत्री झाले असते…

पुण्याच्या जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको… गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा… असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता.

Previous articleMaharashtra | सुरक्षाबलों के खिलाफ ड्रोन का इस्तेमाल कर रहें हैं नक्सली
Next articleGood News | रविवारी “डब्ल्यूकेडी नेस्ट” मध्ये फ्लॅट विकत घेणाऱ्या कुटुंबांना ताबा देणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).