रांची ब्युरो : झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटाच्या प्रकरणात दररोज नवा ट्विस्ट येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खमंग चर्चा रंगल्या आहेत. परंतु यादरम्यान झारखंड कॉंग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर ओराओं, झारखंडमधील कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि कॉंग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हे कथित प्रकरण पूर्णपणे उघड केले आहे. आता झारखंड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर झारखंड सरकार पाडण्याच्या कथित कटाची हवा निघाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुख्य बाब म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्र भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव ओढले जात होते.
झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर ओराओं यांनी म्हटले आहे की, एक पक्ष म्हणून आम्ही अबाधित आहोत. माध्यमांमध्ये जे काही येत आहे ते खरे नाही. पोलिसांसमोर (तीन अटक केलेल्या व्यक्तींनी) दिलेल्या कबुलीजबाबांवर आम्ही अवलंबून राहू शकत नाही.
Jharkhand | Some MLAs had come to meet us. We held a discussion related to reports… (of alleged horse-trading). Some revelations were made. All-in-all, it can be concluded that we're intact as a govt & allegations against the MLAs are baseless: Cong leader Alamgir Alam (28.07) pic.twitter.com/wyEreBKamw
— ANI (@ANI) July 28, 2021
झारखंड मध्ये कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम म्हणाले की, काही आमदार आम्हाला भेटायला आले होते. आम्ही कथित हॉर्स-ट्रेडिंगच्या अहवालांशी संबंधित चर्चा केली. एकंदरीत हा निष्कर्ष काढता येतो की आपण सरकार म्हणून अखंड आहोत आणि आमदारांवर केलेले आरोप निराधार आहेत. जे सांगितले जात आहे ते कधी घडलेच नाही.
We are intact as a party. Whatever is coming in media is not true. We can't rely on the confessions made before Police (by three arrested individuals): Rameshwar Oraon, Jharkhand Congress President (28.07) pic.twitter.com/FtAgonznYP
— ANI (@ANI) July 28, 2021
कॉंग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी आपण आणि आमदार उमाशंकर अकेला यांनी भाजप नेत्यांशी केलेल्या कथित भेटीच्या वृत्तावर म्हटले आहे की आम्ही “कॉंग्रेस भक्त” आहोत, आमच्यात कॉंग्रेसचे रक्त आहे. आम्ही आमच्या पार्टीला कोणत्याही किंमतीत सोडणार नाही.
भाजप : सर्व आरोप निराधार
भाजपचे राज्यातले प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही राज्य भाजप व त्यांच्या काही नेत्यांवर लावलेले सर्व आरोप खोटे व निराधार असून या आरोपात तसूभरही सत्य नाही, असा दावा केला.
चंद्रशेखर बावनकुळे : प्रकरणाशी काही संबंध नाही
महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण साधे कार्यकर्ते असून सरकार पाडण्याएवढी आपली कुवत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी असेही म्हटले आहे कि, ते कधीही झारखंडला गेले नाहीत. अशा परिस्थितीत या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे.
तर चरणसिंह ठाकूर यांनीही आपण काटोलमधील सामान्य व्यक्ती असून नगर परिषदेत एका पक्षाचा आपण नेता आहोत. आपण काटोलच्या बाहेर पडलेलो नाही, झारखंड अद्याप पाहिलेले देखील नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
22 जुलैला काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल यांनी सोरेन सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी 24 जुलैला तिघा जणांना अटक केली होती. अटक केलेल्या तिघांमधील अभिषेक दुबे झारखंडमधील एक ठेकेदार असून तर दुसरा आरोपी निवारण प्रसाद महतो याने बोकारो येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. तिसरा आरोपी अमित सिंह याने आमदार खरेदीसाठी प्रयत्न केले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या तिघा आरोपींच्या जबानीत सोरेन सरकारमधील एकाही आमदाराचे नाव नाही.
या आरोपींच्या म्हणण्यानुसार 15 जुलैला सत्तारुढ सरकारमधील तीन आमदार व जयकुमार बेलखेडे हा मध्यस्थ रांचीहून दिल्लीकडे निघाले. तेथे ते महाराष्ट्र भाजप चे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजप नेते चरण सिंह ठाकुर यांना भेटले. हे तीन आमदार दिल्लीतल्या द्वारका हॉटेलमध्ये भाजपच्या 3 वरिष्ठ नेत्यांना 15 मिनिटे भेटले. दुसर्या दिवशी 16 जुलैला तीन आमदारांनी एक कोटी रु.चा प्रस्ताव ठेवला होता. पण पैसे न मिळाल्याने ते दिल्लीहून रांचीला परत आले. 81 सदस्य संख्या असलेल्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती आघाडी, काँग्रेस, राजद, राष्ट्रवादी व भाकपाचे मिळून 51 आमदार आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपचे 26 व अन्य पक्षांचे 4 आमदार आहेत.