मुंबई ब्युरो : ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत. दोघेही रत्नागिरीतील चिपळूणमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे हे नितीन राऊत यांना पनवेलमध्ये भेटतील. तिथून दोन्ही नेते चिपळूणला रवाना होत आहेत.
लोकांच्या घरापर्यंत वीज कशी द्यावी, मदत कशी पोहोचवावी यासाठी हा दौरा असल्याचे कळते. लोकांची सेवा करणे, ब्लॅंकेट, खाण्याच्या गोष्टी पुरवणे आणि सोलर लाईट देण्याचा कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी 80 टक्के पूर्ण केल्या आहेत, 20 टक्के बाकी आहेत. कर्मचाऱ्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. आज कोकणात जाऊन पाहणी करणार आहे. आदित्य ठाकरे सुद्धा असतील असा निरोप मिळाला आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
नितीन राऊत या दौऱ्यात वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे महावितरण आणि महापारेषणच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे.
“कोकणात मोठ्या प्रमाणात महापुराने आणि अतिवृष्टीनी मोठं नुकसान झालं आहे. त्या भागात जीवितहानीही झाली आहे. अजूनही त्या भागात पाऊस पडतो आहे, हवामान खात्याने अजून चार-पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकांच्या घरापर्यंत वीज कशी नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच आजचा दौरा आहे”, असं नितीन राऊत म्हणाले.
लोकांची सेवा करणे, त्यांना मदतीचा हात देणे, हे सुद्धा काम माझ्या खात्याच्या वर्कर्स युनियनने सुद्धा हाती घेतलं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी सगळे कामाला लागले आहेत. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी 80% आम्ही पूर्ण केल्या आहेत. 20% कामं राहिली आहेत, परंतु हे काम करत असताना जे आमचे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी होते, त्यांना आपल्या जीवाची बाजी लावा लागली. अनेकदा भरपावसात वारा, वादळामध्ये त्यांना पोलवर चढावे लागले. त्यांना कसरत करावी लागली आणि अशा प्रसंगी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माझा हा दौरा आहे, असं नितीन राऊत म्हणाले.
पावसामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1927 गावे आणि शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात आणि पुरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.
14 हजार रोहित्र बंद
पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७ रोहित्रे बंद पडली असताना ९ हजार २६२ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी आता २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी ४४ केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झाले आहे.
चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. अशा परिस्थितीतही नदीला आलेल्या पुराचा धीरोदात्तपणे सामना करत, डोंगरदऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. याबद्दल त्यांच्या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
डॉ. राऊत हे दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर या प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. याशिवाय माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत.