Home National GOOD NEWS | येत्या वर्षात अनेक कंपन्या दोन आकडी पगारवाढ करण्याची शक्यता

GOOD NEWS | येत्या वर्षात अनेक कंपन्या दोन आकडी पगारवाढ करण्याची शक्यता

527

नवी दिल्ली ब्युरो : कोरोनाच्या महामारीने अनपेक्षित रौद्र रूप धारण केल्यामुळे 2020 या वर्षाने अभूतपूर्व लॉकडाउन अनुभवला. त्यामुळे कोरोनाचा प्रसार काहीसा कमी झाला असला, तरी आर्थिक संकटाने मात्र तीव्र रूप धारण केलं. अनेकांचे पगार कापले गेले, कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या, औद्योगिक उत्पादन थांबलं आणि आर्थिक मंदी येऊन ठेपली. हळूहळू अनलॉक होऊ लागल्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. प्रत्येकाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. एकंदरीत अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा लवकर पूर्वपदावर येऊ लागली, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढू लागला, उद्योगधंदे सुरू होऊ लागले, असं निरीक्षण आहे. त्यामुळे भारतातल्या कंपन्या या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 7.3 टक्के पगारवाढ देण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

डेलॉइट टच तोहमात्सू इंडिया एलएलपी या संस्थेने ‘ वर्कफोर्स अँड इन्क्रिमेंट ट्रेंड्स’ या नावाने सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातल्या निष्कर्ष असं सांगतो, की यंदा 2021मधील वेतनवाढ 2020च्या तुलनेत 4.4 टक्के अधिक असेल; मात्र ही वेतनवाढ 2019च्या तुलनेत 8.6 टक्के कमी असेल. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 92 टक्के कंपन्यांनी सांगितले आहे कि ते 2021मध्ये वेतनवाढ देणार आहेत. गेल्या वर्षी त्यातल्या 60 टक्के कंपन्यांनीच वेतनवाढ दिली होती.

हे सर्वेक्षण डिसेंबर 2020मध्ये घेण्यात आलं होतं. तसंच, भारतातल्या उद्योगांपुरतंच मर्यादित होतं. सात क्षेत्रं आणि 25 उपक्षेत्रांतल्या जवळपास 400 संस्था त्यात सहभागी झाल्या होत्या. ‘भारतात 2020मध्ये 4.4 टक्के वेतनवाढ देण्यात आली होती. यंदा ती 7.3 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आपण आर्थिक मंदीतून अपेक्षेपेक्षा वेगाने सावरत आहोत. उद्योगधंदे सुरू झाले आहेत आणि ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे ही वेतनवाढ होणार आहे,’ असं सर्वेक्षणात म्हटलं आहे. 20 टक्के कंपन्या दोन आकडी वेतनवाढ देण्याचं नियोजन करत आहेत. 2020मध्ये केवळ 12 टक्के कंपन्यांनी तेवढी वेतनवाढ दिली होती. 2020मध्ये ज्या 60 टक्के कंपन्यांनी वेतनवाढ दिली, त्यापैकी एक तृतीयांश कंपन्यांनी ऑफ-सायकल इन्क्रीमेंट्स दिली.

2020मध्ये ज्या कंपन्यांनी वेतनवाढ दिली नाही, त्यापैकी सुमारे 30 टक्के कंपन्या गेल्या वर्षीची भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांना बोनस किंवा जास्त वेतनवाढ देणार आहेत. जैविक शास्त्रे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या सर्वाधिक वेतनवाढ देणार आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातल्या कंपन्या तुलनेने कमी वेतनवाढ देणार आहेत. जैविक शास्त्रे या एकमेव क्षेत्रातल्या यंदाच्या वेतनवाढीची पातळी 2019एवढी असेल. बाकीच्या क्षेत्रांतली वेतनवाढ 2019च्या तुलनेत कमीच असेल.

केवळ डिजिटल आणि ई-कॉमर्स कंपन्या 2021मध्ये दोन आकडी वेतनवाढ देण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रांतल्या कंपन्यांची वेतनवाढ कमी असण्याची शक्यता आहे. आनंदोरूप घोष यांनी सांगितलं, ‘ 2020 हे वर्ष नॉर्मल नसल्याने 2019 हे वर्ष तुलनेसाठी योग्य आहे. 2019मध्ये भारता वेतनवाढ 8.6 टक्के होती. 2021मध्ये ती सरासरी 7.3 टक्के असेल. उद्योग-व्यवसाय लवकर पूर्वपदावर येत असल्याने संस्था वेतनवाढीच्या दृष्टीने विचार करत आहेत.

मार्च 2020नंतर बहुतांश कंपन्यांनी ठरवलं, की वेतनवाढ द्यायचीच नाही किंवा पुढे ढकलायची. सुमारे 25 टक्के कंपन्यांनी वरिष्ठ व्यवस्थापनातल्या कर्मचाऱ्यांची वेतनकपात आणखी लांबवली. भारतीय पातळीवर विचार केल्यास 2019मध्ये नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण 14.4 टक्के होतं, तर 2020मध्ये ते 12.1 टक्के झालं. नोकरीवरून काढून टाकण्याचं किंवा संस्थेकडून जबाबदारीत बदल केला जाण्याचं (लेऑफ्स) प्रमाण 2019मध्ये 3.1 टक्के होतं, ते 2020मध्ये 4 टक्के झाले. लेऑफ्सचं प्रमाण आयटी आणि सेवा क्षेत्रात जास्त होतं. नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण सर्वच क्षेत्रांत घटलं, असं सर्वेक्षणात म्हटलं आहे.