मुंबई ब्यूरो : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. या स्थितीतही आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावले टाकायला सुरुवात केली आहेत.
The state gov has prepared guidelines to restart restaurant operations & submitted to concerned authorities. Once finalised, a decision to reopen restaurants will be taken, stated CM Uddhav Balasaheb Thackeray in a meeting with representatives of restaurant business associations.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 28, 2020
राज्य शासनाने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. कोविडमुळे योद्धे ही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरू करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही.
जीवनशैलीत बदल करणे आवश्यक
कोरोना सोबत जगताना आता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, सतत हात धुणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्यासाठी पुन्हा बैठक
एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपीच आहे असे समजा. आपले नाते विश्वासाचे आहे आणि महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन करोना विरुद्ध लढाईत सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाज अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के. भाटिया आदी उपस्थित होते.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).