Home मराठी Nagpur Crime । नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

Nagpur Crime । नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूर ब्युरो : नागपूरच्या पाचपावली परिसरातील बागल आखाडा जवळ एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच कुटुंबातील आलोक मातूरकर नावाच्या 40 वर्षीय आरोपीने या सर्व हत्या केल्या असून हत्याकांडानंतर त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. पत्नी, मुलगी, मुलगा, मेहुणी आणि सासू यांची हत्या आरोपीने केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आलोक मातूरकर टेलरिंगचा व्यवसाय करायचा. तो राहत्या घरातूनच त्याचे व्यवसाय चालवत होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या भयावह हत्याकांडामागे मातूरकर कुटुंबातील कौटुंबिक कलह प्राथमिक कारण दिसून येत आहे. काल रात्री उशिरा किंवा आज सकाळच्या दरम्यान आलोकने त्याच्या घरापासून 200 मीटर अंतरावर राहणाऱ्या सासूच्या घरी जाऊन सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेहुणी अमिषा बोबडे यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आलोक आपल्या घरी आला आणि त्याने पत्नी विजया, मोठी मुलगी परी उर्फ बिंटी यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केली.

अखेरीस त्याने मुलगा साहिलचे उशीने तोंड दाबून त्याची ही हत्या केली.. धक्कादायक बाब म्हणजे मेहुणी आमिषाने सुमारे दीड महिन्यांपूर्वी आरोपी आलोक मातुरकरच्या विरोधात स्थानिक तहसील पोलीस स्टेशनमध्ये आलोक तिला मारहाण करतो आणि त्रास देतो अशी तक्रार दिली होती. मात्र त्या वेळेस पोलिसांनी अदखलपात्र नोंद करत आरोपीला समज घेऊन सोडले होते.

त्यावेळी जर पोलिसांनी एका अविवाहित मेहुणीला मारहाण करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या आलोक विरोधात ठोस कारवाई केली असती तर कदाचित पाच लोकांच्या हत्येची ही भयावह घटना घडली नसती. या कारणावरून आलोकच्या कुटुंबांमध्ये सतत वाद सुरू होते आणि त्याच वादाची परिणीती या भयावह हत्याकांडात झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिकचा तपास करत असून या बाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here