Home मराठी नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये सोमवारपासून सायंकाळी 5 नंतर जमावबंदी : डॉ. नितीन...

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये सोमवारपासून सायंकाळी 5 नंतर जमावबंदी : डॉ. नितीन राऊत

 • सायंकाळी 5 नंतर फक्त रेस्टॉरंट सुरू राहतील
 • शुक्रवारला परिस्थितीचा पुन्हा आढावा
 • नागरिकांनी गरज नसताना रस्त्यावर येऊ नये
 •  कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन

नागपूर ब्युरो : नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 7 जूनपासून 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील. यापूर्वी दोन वाजेपर्यंतची शिथीलता आता 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र 5 वाजल्यानंतर उपहारगृहे वगळता अन्य सर्व घटकांसाठी जमावबंदी ( 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास बंदी )लागू राहील, अशी माहिती ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आज दिवसभरातील विविध बैठकांनंतर सायंकाळी 7.30 वाजता पालकमंत्र्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत शहरातील निर्बंध जारी केले आहेत. या पत्रकार परिषदेला पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, आदी उपस्थित होते.

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी कोरोना विरुद्धची लढाई कायम असून मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी आज प्रशासनाला केली. त्रिसूत्रीचे पालन आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना गेलेला नाही. कोविड नियमांचे पालन करून कोविड नियंत्रणात ठेवण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करतानाच 7 जून पासून नागपूर शहर व ग्रामीण भागासाठी काही निर्बंध व शिथिलता त्यांनी जाहीर केली. पुढील शुक्रवार पर्यंत हे निर्बंध व शिथिलता लागू असेल. त्यानंतर पुन्हा शुक्रवारला या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत जारी करण्यात आलेले निर्णय असे आहेत…
 1. आवश्यक वस्तूंच्या दुकानाची आस्थापनांची वेळ 5 वाजेपर्यंत राहील.
 2. आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकानांची आस्थापनांची वेळ 5 वाजेपर्यंत राहील.
 3. शहरातील मॉल, चित्रपट गृह ,मल्टिप्लेक्स नाट्यगृह, 50 टक्के क्षमतेमध्ये फक्त 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
 4. उपहारगृहे 50 टक्के क्षमतेत रात्री 10 पर्यंत सुरू ठेवता येतील.
 5. लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.
 6. सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वाकिंग, सायकलिंगसाठी सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 5 ते 9 परवानगी आहे.
 7. खाजगी कार्यालय सायंकाळी 5 चपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत 5 वाजेपर्यत ठेवता येईल.
 8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या 50 टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता 100 व्यक्ती पर्यंत मर्यादित.
 9.  लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या 50% उपस्थिती क्षमतेत करता येईल. मात्र ही 50 टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत 100 लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.
 10. अंत्यसंस्कार अधिकाधिक 50 लोकांना उपस्थित राहता येईल
 11. बैठका, निवडणुका,स्थानिक प्रशासन व स्थायी समिती बैठक सहकारी मंडळ ऑनलाईन घेता येतील.
 12. बांधकाम करण्यास परवानगी आहे.
 13. कृषी, शेतीच्या सर्व कामांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी आहे.
 14.  ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित
 15. जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.
 16. सार्वजनिक वाहतूक मालवाहतुकीला परवानगी असेल. बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बध.
 17. आंतरजिल्हा प्रवास, खाजगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील.
 18. मात्र ज्या जिल्हयात ई – पास आवश्यक असेल तिथे स्थानिक नियम पाळावे.
 19. उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्यांना माल निर्यात नियमित पणे सुरू असेल.
 20. शाळा कॉलेजेस सर्व बंद असतील
 21. सर्व धार्मिक स्थळे बंद असतील
 22. सर्व जलतरण तलाव बंद असतील