नवी दिल्ली ब्युरो : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय माध्यम शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे स्वरुप बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता तीन तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांच्या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तसेच केवळ मुख्य विषयांसाठी लेखी परीक्षा होईल. तर उर्वरित विषयांसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात रविवारी दिल्लीत केंद्रातील मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परीक्षा कशाप्रकारे घ्यायच्या यावर बराच खल झाला. यावेळी उपस्थितांनी आपापली मते आणि सूचना मांडल्या.
तीन तासांपेक्षा कमी कालावधीची होऊ शकते परीक्षा?
कोरोनाचा धोका असला तरी केंद्र सरकार बारावीची परीक्षा रद्द करण्यास तयार नाही. काही राज्यांनीही परीक्षा लवकरात लवकर घेण्याचा आग्रह धरला आहे. आतापर्यंत बारावीच्या परीक्षेचा प्रत्येक पेपर तीन तासांचा असे. हा कालावधी आता 90 मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तसेच परीक्षेसाठी काही विषयही वगळले जाऊ शकतात. बारावी इयत्तेच्या एकूण विषयांपैकी केवळ 19 ते 20 मुख्य विषयांची परीक्षा होईल. तर इतर विषयांसाठी शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन केले जाण्याची शक्यता आहे.
दोन टप्प्यांत घेणार परीक्षा
कोरोनाच्या धोक्यामुळे बारावीची परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जावी, अशीही एक सूचना बैठकीत करण्यात आली. तसेच निवडक केंद्रांवरच परीक्षा घेतली जावी. त्यानंतर दोन-तीन महिन्यांत परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी या बैठकीत एक वेगळे मत मांडले. त्यांनी सांगितले की, बोर्डाच्या परीक्षेपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस द्यावी. जेणेकरुन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची धोका कमी असेल.