Home Health Nagpur Hospital Fire । नागपुरातील खाजगी रुग्णालय भीषण आगीत होरपळलेल्या लोकांना पंतप्रधानानी...

Nagpur Hospital Fire । नागपुरातील खाजगी रुग्णालय भीषण आगीत होरपळलेल्या लोकांना पंतप्रधानानी वाहिली श्रद्धांजली

1165

नागपूर ब्युरो : नागपुरात वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयात शुक्रवार संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती. या भीषण आगीत होरपळलेल्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून वाडी येथील आगीत होरपळलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोबतच त्यांनी या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या लोकांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

आम. परिणय फुके यांनी व्यक्त केल्या संवेदना

वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, या शब्दात आम. परिणय फुके यांनी ट्विटर वर पोस्ट केली आहे.

संध्याकाळी साडे आठच्या सुमारास रुग्णालयाच्या वरच्या माळ्यावरील आयसीयूमधून या आगीला सुरुवात झाली आणि पाहता पाहता ही आग आयसीयूसह रुग्णालयात इतरत्र पसरली. आग लागली तेव्हा रूग्णालयात 31 रुग्णांवर उपचार सुरु होते. तडकाफडकी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना खाली आणून इतर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने 4 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. ही आग कशी लागली याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र आयसीयूमधील विजेच्या उपकरणांमधून आधी आगीची सुरुवात झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.